Tibet Airlines plane caught fire in China : चोंगकिंग जियांगबेई (Chongqing Jiangbei International Airport) : चीनच्या चोंगकिंग जियांगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. सावध असलेल्या वैमानिक आणि क्रू सदस्यांनी प्रवाशांना आपत्कालीन व्यवस्थेचा वापर करून सुरक्षित बाहेर काढले. दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. विमानात ११३ प्रवासी आणि ९ क्रू सदस्य होते. याआधी मार्च महिन्यात चीनमध्ये विमानाला अपघात झाला होता. या विमानात १३२ जण होते.
प्राथमिक माहितीनुसार, तिबेट एअरलाइन्सचे विमान चोंगकिंग जियांगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत होते. उड्डाणाच्यावेळी विमान अनियंत्रित झाले आणि धावपट्टीवरून उतरून मोकळ्या मैदानात गेले. तिथेच विमानाला आग लागली. विमान अनियंत्रित होताच वैमानिक आणि क्रू सदस्य सावध झाले. त्यांनी विमान मोकळ्या मैदानावर जाऊन स्थिरावताच प्रवाशांना आपत्कालीन व्यवस्थेचा वापर करून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हिडीओत विमानाला लागलेली आग, आगीमुळे येत असलेला काळा धूर स्पष्ट दिसत आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी चायना ईस्टर्न एअरलाइन कंपनीचे बोईंग ७३७-८०० वुझोउ येथे डोंगराळ भागात कोसळले होते. या दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू झाला होता.