मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकीटाचे दर ठरले, पाहा किती पैसे मोजावे लागणार 

Bullet Train Fare: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा तिकिट दर आता जवळजवळ निश्चित झाला आहे. जाणून घ्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं तिकीट किती असणार? 

Bullet_Train_Fare_India
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकीटाचे दर ठरले!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी तिकीट दर निश्चित
  • डिसेंबर २०२३ पर्यंत बुलेट ट्रेन सुरु करण्याचा सरकारचा मानस
  • आतापर्यंत सरकारने ४५ टक्के जमीन केली अधिग्रहीत

मुंबई: मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन हे मोदी सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास जपानच्या सरकारशी करार केला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच दरम्यान आता या बुलेट ट्रेनचं नेमकं किती प्रवासी भाडं असणार हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकीटाची किंमत ही ३००० रुपये एवढी असणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) च्या एका अधिकाऱ्याने बुलेट ट्रेन आणि तिकीट दराबाबत माहिती दिली आहे. 

पत्रकारांशी संवाद साधताना एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी प्रकल्पाबाबत असं सांगितलं की, 'या संपूर्ण प्रोजेक्टसाठी आम्हाला १३८० हेक्टर जमिनीची गरज आहे. ज्यामध्ये खासगी, सरकारी, वन आणि रेल्वेच्या जमिनीची (महाराष्ट्र आणि गुजरातमधील) आवश्यकता आहे. आम्ही आतापर्यंत ६२२ (जवळजवळ ४५ टक्के) हेक्टर जमीन अधिग्रहीत केली आहे. आम्ही डिसेंबर २०२३ ही मुदत लक्षात ठेवून आम्ही आता पुढे जात आहोत.' 

ते पुढे असंही म्हणाले की, 'हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेनच्या सकाळी सहा वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत जवळजवळ ७० फेऱ्या  (एका बाजूने प्रत्येकी ३५ फेऱ्या) होतील.' 

अचल खरे यांच्या मते, या मार्गावरील चार मोठ्या बांधककामांच्या पॅकेजेससाठी निविदा काढण्यात आल्या असून मार्च 2020 मध्ये बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. खरे यांच्या अंदाजानुसार या संपूर्ण प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. हा प्रोजेक्ट डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन मार्गामध्ये जवळजवळ १२ स्टेशन असणार आहेत. 

दरम्यान, सुरुवातीला बुलेट ट्रेनला प्रचंड विरोध झाला होता. अद्यापही काही ठिकाणी भूमी अधिग्रहणाला विरोध आहे. त्यामुळे भूमी अधिग्रहण करण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यानंतरच या संपूर्ण प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला बुलेट ट्रेनला शिवसेनेसह सर्वच पक्षांनी विरोध केला होता. मुंबई ते अहमदाबाद हाच मार्ग बुलेट ट्रेनसाठी का निवडण्यात आला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. मात्र, असं असलं तरीही भाजप सरकार या बुलेट प्रकल्पासाठी आग्रही असल्याचं दिसतं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी