प. बंगालमध्ये टीएमसी, आसाम आणि पुदुचेरीत भाजप; तामीळनाडूत डीएमके तर केरळमध्ये एलडीएफ

प. बंगालमध्ये टीएमसी, आसाम आणि पुदुचेरीत भाजप; तामीळनाडूत डीएमके तर केरळमध्ये एलडीएफचा विजय झाला.

tmc in west bengal, bjp in assam and puducherry; dmk in tamilnadu and ldf in kerala
प. बंगालमध्ये टीएमसी, आसाम आणि पुदुचेरीत भाजप; तामीळनाडूत डीएमके तर केरळमध्ये एलडीएफ 

थोडं पण कामाचं

  • प. बंगालमध्ये टीएमसी, आसाम आणि पुदुचेरीत भाजप; तामीळनाडूत डीएमके तर केरळमध्ये एलडीएफ
  • प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव
  • केरळमध्ये ई श्रीधरन यांचा पराभव

नवी दिल्ली: ऐन कोरोना संकटात पार पडलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पुदुचेरीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवार २ मे २०२१ रोजी जाहीर झाले. पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यशस्वी झाली. आधी तीन आमदारांमुळे दुर्लक्षित असलेला भाजप पश्चिम बंगालचा विरोधी पक्ष होण्याएवढी मजल मारू शकला. आसाममध्ये भाजपने सत्ता राखली. पुदुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाच्या विधानसभेत भाजपची सत्ता आली. तामीळनाडूत द्रमुक (डीएमके) आणि केरळमध्ये डाव्या विचारांच्या एलडीएफने बाजी मारली. tmc in west bengal, bjp in assam and puducherry; dmk in tamilnadu and ldf in kerala

डाव्यांना हरवून तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालची सत्ता काबीज केली. यानंतर २०१६ आणि आता २०२१ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या जोरावर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालची सत्ता राखली. पण २०२१च्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालचा विरोधी पक्ष होण्याएवढी मजल मारू शकला. या निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्यातील लढत रंगली. एकेकाळी ममता बॅनर्जींचा उजवा हात असलेले शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले. यामुळे सर्वांचे लक्ष नंदीग्रामकडे होते. 

नंदीग्रामच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. शुभेंदू अधिकारी जिंकले. शुभेंदू अधिकारी १६२२ मतांनी विजयी झाले. ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारल्याचे जाहीर करताना निकालाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची घोषणा केली. मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 

आसाम आणि पुदुचेरीत भाजप

काँग्रेसचा पराभव करुन भाजपने २०१६ मध्ये आसामची सत्ता मिळवली. आता २०२१ची निवडणूक जिंकत आसाममध्ये भाजपने सत्ता राखली. पुदुचेरी या केंद्रशासीत प्रदेशातील काँग्रेसच्या नेतृत्वातले सरकार निवडणुकीच्या काही दिवस आधी पाडणाऱ्या भाजपने निवडणूक जिंकून कमाल केली. 

तामीळनाडू आणि केरळचे निकाल जाहीर

तामीळनाडूत द्रमुक (डीएमके) आणि केरळमध्ये डाव्या विचारांच्या एलडीएफने बाजी मारली. केरळमध्ये भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेले मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली. पलक्कड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ई श्रीधरन यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल पुन्हा विजयी झाले. ते ७ हजार ४०३ मतांनी जिंकले. 

निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होणार

विधानसभा निवडणुकांचे अनेक निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप अनेक उमेदवार आघाडीवर असल्याचेच जाहीर झाले आहे. पण उमेदवारांची आघाडी विचारात घेतली तर बहुसंख्य आघाडी घेणारे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. यामुळे ताज्या स्थितीनुसार प. बंगालमध्ये टीएमसी, आसाम आणि पुदुचेरीत भाजप; तामीळनाडूत डीएमके तर केरळमध्ये एलडीएफचा विजय झाल्याचे दिसत आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २००पेक्षा जास्त जागांवर तर भाजप ८० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीए ७० पेक्षा जास्त जागांवर तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांचे यूपीए ५० जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए १६ जागांवर तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांचे यूपीए ८ जागांवर आघाडीवर आहे. तामीळनाडूत काँग्रेस आणि सहकारी पक्षांचे यूपीए १५०पेक्षा जास्त जागांवर तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए ७०पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये एलडीएफ ९०पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच सर्वाधिक जागा जिंकणारा गट किंवा पक्ष सत्तेसाठी औपचारिक दावा सादर करणार आहे. ज्या राज्यात सर्वाधिक जागा एका पक्षाला वा गटाला मिळतील तिथे सर्वात मोठा पक्ष अथवा त्याच्या नेतृत्वातील गट सत्तेसाठी दावा करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी