Documentary Poster Issue | चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या काली नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून सध्या जोरदार वाद सुरू झाला आहे. या वादात आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उडी घेतली असून एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. काली चित्रपटाच्या पोस्टरचं त्यांनी समर्थन केलं असून काली मां ही आपल्यासाठी मांसाहार करणारी आणि मद्यपानही करणारी देवी आहे, असं त्या म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेसनं मात्र मोईत्रा यांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. महुआ मोईत्रा यांचं ते वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर आपण कुठल्याही सिनेमाच्या पोस्टरचं समर्थन केलं नसून केवळ माझं मत व्यक्त केलं आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
महुआ मोईत्रा यांनी काली माँ या देवीबाबत त्यांचं मत विस्तारानं मांडलं आहे. देवीची कित्येक रुपं आहेत. माझ्या दृ्ष्टीनं देवी ही मांसाहार करणारी आणि मद्यपानाचा स्वीकार करणारी आहे. प्रत्येकाचं देवीबाबत वेगवेगळं मत आणि कल्पना असू शकतात. त्यामुळे मला या पोस्टरवर कुठलाही आक्षेप घ्यावासा वाटत नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मनात असणाऱ्या देवीची कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणं अशी आहेत, जिथं देवाला मद्य अर्पण केलं जातं. तर काही ठिकाणी असं करणं ही ईशनिंदा मानली जाते.
त्या पुढं म्हणाल्या, तुम्ही तुमच्या देवाला कसं पाहता? जर तुम्ही भूतान किंवा सिक्कीमला गेलात, तर तिथं देवाला सकाळच्या पूजेत दारुचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्ही उत्तर प्रदेश किंवा गायपट्ट्यात आलात आणि दारु हा प्रसाद म्हणून वाटू लागलात, तर लोकांच्या भावना दुखावू शकतात. त्याचप्रमाणं माझ्या मनात माझ्या देवीचं एक स्वरूप ठरलेलं आहे. भारताच्या वेगवेगळ्या भाागात वेगवेगळ्या रुपांतील देवीची पूजा केली जाते.
अधिक वाचा - Lalu Yadav Health : लालू यादव यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून पीएम मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा
मला माझ्या देवीची कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे. जर तुम्ही तारापीठला गेलात, तर काली मां मंदिरापाशी अनेक साधू स्मोकिंग करताना दिसतात. कित्येक लोक अशा प्रकारे देवीची पूजाही करतात. हिंदू असूनही मला माझ्या देवीची कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि सर्वांनाच ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. पूजेचा अधिकार हा पर्सनल स्पेसमध्ये असला पाहिजे. जोपर्यंत मी तुमच्या स्पेसमध्ये अतिक्रमण करत नाही, तोपर्यंत तुम्हालाही माझ्या स्पेसमध्ये अतिक्रमण करण्याचा अधिकार असू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
अधिक वाचा - Britain: बोरिस जॉन्सन सरकार संकटात! दोन दिग्गज मंत्र्यांनी दिला राजीनामा; जॉन्सनच्या नेतृत्त्वावर प्रश्न?
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लीना मणीमेलकई यांच्या ‘काली’ या ड्रॉक्युमेंट्रीवरून हा वाद सुरू झाला आहे. या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टमध्ये त्यांनी कालीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला स्मोकिंग करताना दाखवलं आहे. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोस्टरमध्ये काली मांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात LGBTQ चा झेंडा दाखवण्यात आला आहे. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे.