बंगळुरू: कृषी कायद्यांविरोधात हिंसक आंदोलन झाले. यानंतर पहिल्यांदा टूलकिट प्रकाशात आले. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने हे टूलकिट ट्वीट केले. नंतर ग्रेटाने ते ट्वीट डीलीट केले. पण तोपर्यंत टूलकिट जगजाहीर झाले. हे टूलकिट तयार करणाऱ्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरुन बंगळुरूत एक अटक झाली. पर्यावरण रक्षणाचे सामाजिक कार्य करते अशी ओळख सांगणाऱ्या दिशा रवी हिला अटक झाली. (Disha Ravi asked Greta to remove toolkit; worked with Poetic Justice Foundation to draft the doc: Delhi Police)
भारतात सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिटमध्ये मार्गदर्शन आहे. या टूलकिटच्या मसुद्यावर काम केल्याचा आरोप दिशा रवी हिच्यावर आहे. दिशा ही २१ वर्षांची तरुणी आहे. ठोस पुराव्यांच्या आधारे दिशाला बंगळुरूतून अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले. दिशाचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला.
दिल्ली पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांनी सखोल तपासणी केली. या तपासणीत दिशा रवी हिने टूलकिटच्या मसुद्याचे संपादन केल्याचे पुरावे हाती आले. यानंतर दिशाला अटक केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. अटक केल्यानंतर विमानाने दिशाला दिल्लीत आणण्यात आले. तिला दिल्लीच्या कोर्टात हजर करण्यात आले. चौकशी करण्यासाठी दिशाची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली. कोर्टाने दिशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. (toolkit case disha ravi send in police custody for five days)
दिशाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन टूलकिट तयार करण्यासाठी बरीच चर्चा केली. खलिस्तान समर्थक पोएटिक जस्टिस फाउंडेशन या गटासोबत हातमिळवणी करुन दिशाने टूलकिटच्या मसुद्याचे संपादन केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. ग्रेटाने टूलकिट ट्वीट केले. नंतर दिशाने सांगितले म्हणून ग्रेटाने ट्वीट डीलीट केले, असेही दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
टूलकिटच्या संपादन प्रक्रियेत दिशा रवी हिच्यासह आणखी काही जण सहभागी आहेत. लवकरच इतरांना अटक करुन कोर्टात हजर करू, असे पोलिसांनी सांगितले. दिशाने टूलकिटचे शेवटचे संपादन ३ फेब्रुवारी रोजी केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. याआधीही टूलकिटच्या मसुद्याचे संपादन झाले आहे.
कोर्टात दिशा रडली, तिने टूलकिटचे संपादन केल्याचे कबूल केले पण फक्त दोनच ओळी संपादीत केल्या असे सांगितले. शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी टूलकिट संपादीत केल्याचे दिशा म्हणाली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
दिशाच्या अटकेचे वृत्त जाहीर झाल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी ट्वीट केले. यात दिशाच्या अटकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.
याआधी दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने एक एफआयआर नोंदवली. यात गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे, देशद्रोह तसेच भारतीय दंडविधानातील इतर गंभीर कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भारत सरकार विरोधात टूलकिटच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक युद्ध पुकारल्या प्रकरणी खलिस्तान समर्थकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली. गूगल, ट्विटर यांच्यासह भारतात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून पोलिसांनी टूलकिट संदर्भातल्या पोस्ट, इ-मेल, डोमेन यूआरएल, सोशल मीडिया अकाउंट यांची माहिती मागवली.