Amaranath Yatra : पुढील महिन्यातील 30 जूनपासून अमरनाथ (Amarnaath) यात्रा (Pilgrimage ) सुरू होणार आहे. मात्र, या यात्रेवर दहशतवादाचे (Terrorism) सावट दिसू लागले आहे. दहशतवादी संघटना (terrorist organization) TRF ('द रेजिस्टेंस फ्रंट ) ने पत्राद्वारे धमकी दिली आहे. या पत्रातून TRF ने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली आहे. यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.
धमकीच्या पत्राद्वारे दहशतवाद्यांनी म्हटलं की, आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात नाही. काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 15,000 ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी ही 15 दिवसांपासून ते 80 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.
आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असेही टीआरएफने म्हटले आहे. राजकीय फायद्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून त्याला विरोध करणार असल्याचे टीआरएफने म्हटले. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत दिली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा आणि योग्य तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा 30 जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, श्रीनगर पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर/टीआरएफच्या 2 स्थानिक संकरित दहशतवाद्यांना अटक केली आहे. 15 पिस्तूल, 30 मॅगझिन, 300 राऊंड आणि 1 सायलेन्सरसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे आयजी काश्मीर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.