कोण आहे साद रिझवी, ज्याच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर आली बंदी

पाकिस्तानमध्ये तहरीक ए लब्बैक पाकिस्तान संघटनेच्या चिथावणीनंतर झालेल्या दंगलीत सात नागरिकांचा आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. यानंतर इमरान खान सरकारने कठोर पावले उचलली.

Twitter, Facebook, YouTube, WhatsApp, Telegram suspended in Pakistan: interior ministry
पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर आली बंदी 

थोडं पण कामाचं

  • कोण आहे साद रिझवी, ज्याच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर आली बंदी
  • पाकिस्तानमध्ये तहरीक ए लब्बैक संघटनेवर बंदी
  • दंगल प्रकरणी पाकिस्तानमध्ये मोठे अटकसत्र सुरू

इस्लामाबाद: फ्रान्सच्या चार्ली हेब्दो मासिकात मुहम्मद पैगंबर यांचे कार्टून काही वर्षांपूर्वी काढण्यात आले होते. या प्रकरणी फ्रान्सच्या राजदूताची पाकिस्तानमधून हकालपट्टी करू असे आश्वासन पाकिस्तान सरकारने तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) संघटनेला दिले होते. संसदेने एक ठराव बहुमताने मंजूर केला तरच ही कारवाई होईल, असेही पाकिस्तान सरकारने सांगितले होते. पण पुढे काही कारवाईच झाली नाही. खादिम हुसैन रिझवी यांच्या निधनानंतर साद रिझवी याने तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. यानंतर साद रिझवीने पुन्हा एकदा फ्रान्सच्या राजदूताच्या हकालपट्टीची मागणी केली. इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्याचा मुद्दा पुढे करुन तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा प्रमुख साद रिझवी याने दिलेल्या चिथावणीनंतर दंगल भडकली. दंगलीत सात नागरिकांचा आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला. तसेच ३४० पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. सलग तीन दिवस झालेल्या दंगलीमुळे पाकिस्तानमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडली. इमरान खान सरकारने साद रिझवी याला अटक केली. दंगलीप्रकरणी धरपकडीची कारवाई सुरू झाली. सध्या पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. देशात कुठेही अफवा पसरून अथवा कार्टूनच्या मुद्यावरुन पुन्हा दंगल होऊ नये यासाठी पाकिस्तानने ट्विटर, फेसबुक, यू ट्युब, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम या सोशल मीडियावर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या दूरसंचार विभागाने ही बंदी घातली आहे.

अफवा पसरू नये तसेच दंगलीबाबतची माहिती, मते , व्हिडीओ आणि ऑडिओ यांच्यामुळे पुन्हा वातावरण तापू नये यासाठी सोशल मीडियावर बंदी घातल्याचे पाकिस्तान सरकारने सांगितले. तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा नेता साद रिझवी तसेच दंगल करणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली. लाहोर, कराची इस्लामाबाद येथे मोठ्या प्रमाणावर अटकसत्र सुरू झाले. अनेकांची धरपकड केल्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तान सरकारने तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेवर बंदी घातली आहे. 

कोण आहे साद रिझवी?

लाहोरच्या एका मशिदीत खादिम हुसैन रिझवी या मौलवीने २०१७ मध्ये तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात टीएलपी या संघटनेची स्थापना केली. याआधी २०११ मध्ये पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या करणाऱ्या गार्ड मुमताज कादरी याचे समर्थन केले. साद रिझवी खादिम हुसैन रिझवीचा मुलगा आहे. खादिम हुसैन रिझवीच्या निधनानंतर सादर रिझवी तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा प्रमुख झाला. त्याने संघटनेचा प्रभाव वाढवण्यासाठी चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्टूनचा एका मुद्यासारखा वापर करुन घेतला. याआधी तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेने २०१८ मध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना २५ लाख मते मिळाली होती. ताज्या घटनेनंतर पाकिस्तानमधील जहाल विचारांच्या गटाचे समर्थन संघटनेला मिळाल्याचे चित्र आहे.

पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता

काही दिवसांपूर्वी चार्ली हेब्दो मासिकात मुहम्मद पैगंबर यांचे कार्टून पुन्हा छापण्यात आले होते. मासिकाच्या या कृतीला फ्रान्स सरकारने पाठिंबा दिला होता. यानंतर तहरिक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन पाकिस्तानमध्ये वातावरण तापवले. सध्या पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी