Omicron भारतात, मोदी सरकार समोर लसीकरणाचे २९ दिवसांचे बिकट आव्हान

Omicron Detected In India भारतातील कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले. यामुळे मोदी सरकारवर लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी दबाव वाढला आहे.

Omicron in India
Omicron भारतात, मोदी सरकार समोर लसीकरणाचे २९ दिवसांचे बिकट आव्हान 
थोडं पण कामाचं
  • Omicron भारतात, मोदी सरकार समोर लसीकरणाचे २९ दिवसांचे बिकट आव्हान
  • गुरुवार २ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १२४ कोटी कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचून झाले
  • लसचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या ४५ कोटींपेक्षा जास्त

Two Omicron cases in India नवी दिल्ली: भारतातील कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले. यामुळे मोदी सरकारवर लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी दबाव वाढला आहे.

मोदी सरकारने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून मोहीम राबविण्यास सुरुवात केली. भारतात याआधी कधीही एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही. यामुळे हे आव्हान पूर्ण करणे कठीण आहे याची जाणीव असूनही सरकारने प्रयत्न सुरू केले. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुरुवार २ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १२४ कोटी कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचून झाले आहेत. लसचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या ४५ कोटींपेक्षा जास्त आहे तर लसचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ७९ कोटींपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत लसीकरणासाठी पात्र असलेल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

मोदी सरकारला लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आणखी ९० कोटी कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचायचे आहेत. याचा अर्थ पुढील २९ दिवसांत दररोज किमान ३ कोटी लसचे डोस टोचावे लागतील. हे अतिशय कठीण असे आव्हान आहे.

याआधी भारताने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १०० कोटी लसचे डोस टोचण्याचा विक्रम केला.  यानंतर ४१ दिवसांत आणखी २४ कोटी लसचे डोस टोचण्यात आले. याचा अर्थ दररोज सरासरी ६० लाख लसचे डोस टोचण्यात आले. या पद्धतीने काम सुरू राहिले तर ३१ डिसेंबर पर्यंत १८ कोटी लसचे डोस टोचून होतील. केंद्र सरकारने निश्चित केलेले लक्ष्य साध्य होणार नाही. पण यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोना विषाणू ओमायक्रॉन या नव्या रुपात सक्रीय झाला आहे. 

ओमायक्रॉनचे २९ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत विषाणूच्या या अवतारामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबतची आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल.

ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे. 

आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉनचे ३७३ रुग्ण आढळले आहेत. पण कोणाचाही मृत्यू झालेला नाही. रुग्ण उपचार घेत आहेत आणि त्यांच्या तब्येतीला आराम पडत आहे. पण तज्ज्ञांच्या मते एक ओमायक्रॉनबाधीत व्यक्ती किमान ३५ जणांना या विषाणूने बाधीत करण्यास सक्षम आहे. 

एक दिलासा देणारी बाब म्हणजे ज्या दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉनचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तिथल्या एकालाही विषाणूच्या नव्या अवतारामुळे जास्त त्रास झालेला नाही. वास येत नाही, चव लागत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो; अशा स्वरुपाच्या तक्रारी कोणीही केलेल्या नाही. यामुळे ओमायक्रॉनवर संशोधन सुरू ठेवणे, लसीकरणाचा वेग वाढवणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे याद्वारे ओमायक्रॉनमुळे निर्माण झालेले संकट नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

निवडक राज्यांची बूस्टर डोसची मागणी

भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतील नेत्यांनी केंद्र सरकारकडे बूस्टर डोसची मागणी करायला सुरुवात केली आहे. केंद्राने तज्ज्ञांचे मत आजमावून बूस्टर डोस बाबतचा निर्णय घेऊ असे संकेत दिले आहेत. अद्याप केंद्र सरकारने बूस्टर डोसची परवानगी दिलेली नाही. केंद्र सरकारचे प्राधान्य लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांचे लसीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यावर आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी