UPSC Results 2022 : कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएसीने (UPSC)सोमवारी नागरी सेवा, 2021 चा अंतिम निकाल जाहीर केला. यात महाराष्ट्राच्या तरुणांनीही यश (UPSC Success) मिळवले आहे. कोल्हापूरच्या दोन इंजिनियरना (Engineers from Kolhapur)यात यश मिळाले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असणाऱ्या या दोन इंजिनियरसाठी त्यामुळे नागरी सेवांचे दरवाजे खुले झाले आहेत. स्वप्निल तुकाराम माने (Swapnil Tukaram Mane) याने तर यश कसे मिळवायचे याचा वस्तूपाठच घालून दिला आहे. परिस्थितीमुळे फळविक्रेता म्हणून काम केलेल्या जिद्दी स्वप्निलने आता सनदी अधिकारीपदावर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे आशिष अशोक पाटील (Aashish Patil) या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या दोघांच्याही यशाने महाराष्ट्राची आणि कोल्हापूरची मान उंचावली आहे. (Two engineers from Kolhapur get success in UPSC 2022)
अधिक वाचा : UPSC Success Story: JNU मधून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जामियामधून कोचिंग, UPSC टॉपर श्रुती शर्माची कहाणी...
सर्वांचेच लक्ष लागलेला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांनी यश मिळवत इतरांसमोर उदाहरण निर्माण केले आहे. यातील स्वप्निल तुकाराम माने हा सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील राहणारा आहे. स्वप्निलला 578 बी रॅंक मिळाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातीलच साळशी (ता. शाहुवाडी) येथील आशिष अशोक पाटील याला 563 रॅंक मिळाली आहे.
अधिक वाचा : व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यू; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा
लहानपणापासूनच कष्ट करत जिद्दी आपला प्रवास साकारणाऱ्या स्वप्निलने यश मिळवू इच्छिणाऱ्या लाखो तरुणांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. स्वप्निल चौथीत असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. दुर्दैवाने त्यानंतर दोनच वर्षांनी वडिलांचे निधन झाले होते. त्याचे वडील तुकाराम माने हे एक छोटासा व्यवसाय सांभाळत असत. अशा कठीण परिस्थितीत स्वप्निलला त्याच्या आजी आजोबांनी सांभाळले. स्वप्निलला दोन बहिणी असून एक विवाहित आहे तर दुसरी शिक्षण घेते आहे. विद्यार्थी दशेपासूनच आपली चूणूक दाखवणाऱ्या स्वप्निलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. इंजिनियरिंग करत असतानाच त्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्यादेखील घेतल्या होत्या. वेळप्रसंगी उत्पन्न मिळवण्यासाठी फळविक्रेता म्हणूनदेखील काम केले. स्वप्निलने कष्टाने आपले इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने यूपीएससीच्या तयारीवर लक्ष दिले होते. आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने स्वप्निलने यूपीएससीत यश खेचून आणले आहे.
कोल्हापूरच्याच मातीतील आणखी एक तरुण आशिष पाटील हा विद्यार्थी दशेपासूनच हुशार विद्यार्थी आहे.
चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तो राज्यात तिसरा आला होता. त्याचबरोबर आशिषने दहावीमध्ये घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतदेखील यश संपादन केले होते. आशिषने नंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. आशिषने पुण्यातच इंजिनियरिंगची पदवी घेतली. यानंतर आशिषने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी तो काही काळ दिल्लीत जाऊन तेथील एका संस्थेतून मार्गदर्शनदेखील घेऊन आला. मागील वर्षी आशिषने यूपीएससी परिक्षेची प्राथमिक फेरी पार केली होती. मात्र त्याला मुख्य परिक्षेचा अडथळा पार करता आला नाही. तरीदेखील त्याने जिद्द कायम ठेवत तयारी सुरू ठेवली आणि यंदा यूपीएससीमध्ये दिमाखदार यश मिळवले आहे.
या दोन्ही कोल्हापूरकरांनी जिद्द, मेहनत, ध्येय या जोरावर यूपीएससीत जे यश मिळवले आहे त्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याच नव्हे तर इतरही क्षेत्रात यश मिळवू पाहणाऱ्या तरुणांसमोर एक चांगले उदाहरण सादर केले आहे.