Two Trains collided head-on in Greece: ग्रीसमध्ये दोन ट्रेन्सचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रेन्सची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात 29 जणांचा मृत्यू झाला असून 85 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितले की, एक प्रवासी ट्रेन उत्तर एथेंस येथून थेसालोनिकीच्या दिशेने जात होती. तर दुसरी ट्रेन थेसालोनिकीहून लारिसा शहराकडे जात होती. लारिसा येथे या दोन्ही ट्रेन्स एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातानंतर प्रवासी ट्रेनचे चार डब्बे रेल्वे रुळावरुन खाली उतरले. समोरासमोर धडक झाल्यावर ट्रेन्सला आग सुद्धा लागली. आगीत रेल्वेचे चार डब्बे जळून खाक झाले.
हे पण वाचा : लग्नाच्या पहिल्या रात्री काय करतात भारतीय जोडपे
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये जवळपास 350 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आणि जवळपास 250 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. एका प्रवाशाने सांगितले की, त्याने सुटकेसच्या सहाय्याने ट्रेनची खिडकी तोडली आणि बाहेर आला.
हे पण वाचा : आंबट चिंच केसांसाठी लाभदायक, जाणून घ्या कशी?
अपघातानंतर घटनास्थळावरुन जे फोटोज समोर आले आहेत त्यावरुन अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवण्यात येतो. ट्रेनचे काही डबे रुळावरुन खाली घसरले होते. ट्रेनच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. सर्वत्र धुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. अपघात झाला त्यावेळी रात्र असल्याने बचावकार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या.