'वर्षभरापूर्वीच शिवसेना-भाजप युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर झालेली चर्चा', शेवाळेंचा गौप्यस्फोट

साधारण वर्षभरापूर्वी मोदी आणि उद्धव ठाकरे यांची युतीबाबत चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला. १२ खासदारांसह शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राहुल शेवाळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

uddhav thackeray hour long discussion with modi about shiv sena bjp alliance a year ago mp rahul shewale secret blast
'वर्षभरापूर्वीच युतीबाबत ठाकरेंची मोदींसोबत झालेली चर्चा' 
थोडं पण कामाचं
  • मोदी-ठाकरेंची वर्षभरापूर्वी युतीबाबत तासभर चर्चा झाली, शिवसेना खासदाराचा दावा
  • उद्धव ठाकरेंना सल्ला देणाऱ्यांमुळे युती झाली नाही, राहुल शेवाळेंचा दावा
  • उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएला पाठिंबा दिल्याने १२ खासदारांनीही केलं बंड

नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहे. आज (19 जुलै) राजधानी दिल्लीत शिवसेनेच्या तब्बल १२ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंना आणखी एक हादरा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बारा खासदारांची पत्रकार परिषदही पार पडली. याच पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला.

साधारण वर्षभरापूर्वीच शिवसेना-भाजप यांच्या युतीबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची तब्बल तासभर चर्चा झाली होती. या भेटीनंतर युतीबाबत अनेक गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकली नाही. असा खळबळजनक दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.   

राहुल शेवाळेंचा खळबळजनक दावा 

'सर्व खासदारांना २०२४ ची निवडणूक लढवायची असेल तर युती करणं महत्त्वाचं आहे. ज्या युतीच्या माध्यमातून आपण निवडून आलो आहोत त्या मतदारांची देखील ती मागणी आहे. म्हणून आम्ही युतीसाठी आग्रह धरला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वारंवार याच गोष्टीचा उल्लेख केला की, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवू या म्हणून. पण आम्ही सर्वांनी त्याला विरोध दर्शवला.'

अधिक वाचा: "रामदासभाई जायचंय तर सरळ जा पण मातोश्रीवर..": किशोरी पेडणेकर

'प्रत्येकाने लोकसभा मतदारासंघाच्या अडचणी अरविंद सावंत यांना दिली होती. त्यांनी देखील ती भूमिका मान्य करुन उद्धव ठाकरेंसमोर ठेवली होती. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की, जर आपल्याला एनडीएसोबत जायचं असेल तर आपल्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाचे NDA उमेदवारांना जर आपण पाठिंबा दिला तर एनडीएच्या दिशेने जाण्यासाठी मोठं पाऊल आपल्याकडून उचललं जाईल.' असं राहुल शेवाळे यावेळी म्हणाले.

'त्याच वेळी शिवसेनेचे सर्व नेते, खासदारांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंनी देखील आम्हाला सांगितलं की, मला देखील युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करण्याचा खूप प्रयत्न केला. यावेळी त्यांनी हा देखील उल्लेख केला की, ज्यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला भेटायला आले त्याच भेटीत त्यांनी मोदी साहेबांकडे उल्लेख केला. यावेळी मोदी साहेबांसोबत एक तास चर्चा देखील झाली. युतीसंदर्भात ही चर्चा झाली.' 

अधिक वाचा: शिंदे गटाला भाजपचा धक्का, CMच्या जवळील तिघांचा भाजप प्रवेश

'साधारण ती बैठक जूनला झाली आणि जुलैलाच अधिवेशन होतं विधानसभेचं. त्या अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटलं की, एकीकडे युतीची चर्चा सुरु आहे आणि दुसरीकडे १२ आमदारांवर कारवाई होतेय. यामुळे भाजपच्या पक्ष श्रेष्ठींमध्ये देखील नाराजी पसरली.' असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

'किती वेळा उद्धव साहेबांनी युतीबाबत चर्चा केली पण भाजपला जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हवा होता तो शिवसेनेकडून मिळालं नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनीच आमच्यासमोर केला होता. उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलं होतं की, माझ्या परीने मी युतीकरिता संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आता तुम्ही स्वत: तुमच्या परीने युतीचे प्रयत्न करा. या गोष्टींचा उल्लेख केला तेव्हा मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांना देखील या संदर्भात भूमिका स्पष्ट केला.' 

'आमच्या चार-पाच बैठक झाल्या. शेवटच्या बैठकीत देखील आम्ही उल्लेख केला आहे की, आपण युती करायला पाहिजे. साहेबांचा नेहमीच रिस्पॉन्स होता की, मी युती करायला तयार आहे. परंतु मला सहकार्य मिळत नाही. हे एके ठिकाणी चालत असताना दुसरीकडे संजय राऊत मविआच्या बैठका, उपराष्ट्रपती पदाच्या यूपीए उमेदवाराला पाठिंबा घोषित करणं. या सगळ्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली की, आमच्याकडे युतीच्या चर्चा होत आहेत. आम्हाला सांगत आहेत की, मी युतीच्या बाबत थकलेलो आहे तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा. आम्ही सगळ्यांनी युतीचे प्रयत्न केल्यावर उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएच्या मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिल्याने सर्व खासदारांमध्ये नाराजी झाली.' असं म्हणत राहुल शेवाळे यांनी १२ खासदार शिंदे गटाबरोबर का जात आहेत हे स्पष्ट केलं.

अधिक वाचा: शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, खासदाराचा गौप्यस्फोट

'मार्गारेट अल्वा या चार वर्ष महाराष्ट्राच्या प्रभारी होता. त्या काळात शिवसेनेवर भरपूर अन्याय झाला होता. अशा उमेदवाराला सहकार्य करणं हे आम्हाला उचित वाटलं नाही म्हणून आम्ही त्यासंदर्भात आमची विरोधी भूमिका स्पष्ट केली आणि आमच्या खासदारांची हीच भूमिका झाली की, वेळोवेळी युती करण्यसाठी विनंती करत राहिलो. पण साहेबांच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.' असं म्हणत राहुल शेवाळे यांनी युती न होण्याचं  खापर हे उद्धव ठाकरेंवर फोडलं आहे.

'आता माझी गटनेता म्हणून नियुक्ती झालीए'

'एनडीएचे जे उमेदवार असणार आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मी सांगू इच्छितो की, ही सर्व भूमिका स्पष्ट करताना आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आमचे जे गटनेते होते विनायक राऊत यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली होती. गेले दोन-अडीच वर्ष खासदारांना त्यांनी जो त्यांच्या कामाच्याबाबत न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात अपयशी ठरले होते. म्हणून गटनेता बदलावा ही आमची विनंती होती. पण ती सुद्धा विनंती मान्य केली नाही. त्यामुळे सर्वांनीच मिळून आम्ही निर्णय घेतला आणि सर्वांच्या संमतीने गटनेता म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने. आम्ही कुठलाही पक्ष, गट स्थापन केलेला नाही. केवळ आम्ही गटनेता बदलेला आहे. आमच्या पक्षाच्या मुख्य प्रतोद भावना गवळी याच आहेत.' असंही राहुल शेवाळे यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी