कोरोनामुळे देशातल्या सर्व टोलनाक्यावर टोलवसुली बंदी, गडकरींची घोषणा 

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.

Toll naka
देशभरात तात्पुरती टोलमाफी, गडकरी यांची मोठी घोषणा   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः  देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. नितिन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद असतील. 

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही.  गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणं तात्पुरत्या स्वरुपात बंद केलं आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळं वाचू शकेल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. ‘रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील’ असं गडकरींनी स्पष्ट केलं.

गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. कोरोनामुळे सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान हायवे तसेच राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि अॅम्ब्युलन्स आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.  

संचारबंदी लागू झाल्यामुळे कोणालाही विनाकारण वाहनाने प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणारी वाहतूक यासाठीच प्रवासाला परवानगी आहे.

कोरोना रुग्णांसाठी 15 हजार कोटींची मदत 

केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांचा उपचारासाठी 15 हजार कोटींची तरतूद केली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जोमानं काम करताहेत. तसंच लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहेत. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी