UP, Punjab, Uttarakhand, Goa, Manipur Election 2022 : 7-phase election in UP, results for all states on March 10 : नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणीपूर या पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणूक होईल. उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यांतील मतदान फक्त एका टप्प्यात पार पडेल. तसेच मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडेल. सर्व राज्यांची मतमोजणी १० मार्च २०२२ रोजी होईल.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रचार, उमेदवारी अर्ज भरणे, निवडणूक, मतमोजणी ही सर्व प्रक्रिया कोविड प्रोटोकॉलचे पालन करत पूर्ण केली जाईल. उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करण्याचे बंधन असेल.
मतदानाच्या दिवशी सर्व संवेदनशील (क्रिटिकल) पोलिंग स्टेशनवर (मतदान केंद्र) व्हिडीओ शूटिंग केले जाईल. सरकारी सेवेत असलेले ९०० आएएस-आयपीएस निवडणूक निरीक्षक म्हणून काम करतील. निवडणुकीसाठी १६२० महिला मतदान केंद्र तयार केली जातील. या मतदान केंद्रांवर फक्त महिला मतदार मतदान करू शकतील. इतर मतदान केंद्रांवर पुरुष-महिला असे सर्व मतदार मतदान करू शकतील.
प्रत्येक राज्यातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण सर्वाधिक मतदार उत्तर प्रदेश या एका राज्यात वाढले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये २९ टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. कोरोना संकटामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोरोनाबाधीत, ८० पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच गंभीर आजारामुळे कायमचे बिछान्यावर असलेले रुग्ण यांना योग्य कादपत्रांसह अर्ज करुन पोस्टल बॅलट पद्धतीने मतदान करता येईल.
मतदान व्यवस्थित पार पाडण्यासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्रांची स्थापना केली जाईल. मतदान केंद्रावर मास्क घालणे सक्तीचे असेल. सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच मतदान करता येईल. मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था असेल.
गोव्यातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लसचा दुसरा डोस घेतला आहे. उत्तराखंडमधील ९९ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लसचा दुसरा डोस घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस तर ५२ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लसचा दुसरा डोस घेतला आहे. पंजाबमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला तर ४२ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लसचा दुसरा डोस घेतला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दारोदारी जाऊन मास्क घातलेल्या कार्यकर्त्यांना प्रचार करता येईल. एकावेळी एका घरातील सदस्यांची भेट घेण्यासाठी दारी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्तीत पाच एवढीच असेल. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने सभा घेता येतील. सार्वजनिक सभा, रॅली, मिरवणुका, बाइक रॅली, रोड शो यावर १५ जानेवारी २०२२ पर्यंत बंदी असेल.
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणूक होईल. उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्याच्यावेळी पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांची निवडणूक एका टप्प्यात होईल. उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी २०२२ रोजी होईल. या टप्प्यासाठी अधीसूचना १४ जानेवारी २०२२ रोजी काढली जाईल. २१ जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेल. उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांच्या निवडणुकीच्या एकमेव टप्प्यासाठी २१ जानेवारी २०२२ रोजी अधीसूचना काढली जाईल. उत्तर प्रदेशचे दुसऱ्या टप्प्याचे आणि पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांच्या निवडणुकीच्या एकमेव टप्प्याचे मतदान १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होईल.
पहिला टप्पा - १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा - १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पा - २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पा - २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा - ३ मार्च २०२२
सातवा टप्पा - ७ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२
मतदान - १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२
मतदान पहिला टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
मतदान दुसरा टप्पा - ३ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२