विदेशातून येणाऱ्या पैशांवर चालणाऱ्या PFIच्या दोघांना अटक

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स - एसटीएफ) दोन जणांना अटक केली. अटक केलेल्या दोघांनी बंदी घातलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेचे सदस्य असल्याची कबुली दिली.

UP STF get Shocking information about PFI, 'funding' coming from outside countries
विदेशातून येणाऱ्या पैशांवर चालणाऱ्या PFIच्या दोघांना अटक 

थोडं पण कामाचं

  • विदेशातून येणाऱ्या पैशांवर चालणाऱ्या PFIच्या दोघांना अटक
  • पीएफआयकडून जप्त केले बॉम्ब निर्मितीचे साहित्य
  • पीएफआयचा सीएए विरोधी दंगलीत तसेच शेतकरी आंदोलनात हात

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स - एसटीएफ) दोन जणांना अटक केली. अटक केलेल्या दोघांनी बंदी घातलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेचे सदस्य असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पीएफआयच्या सदस्यांकडून बॉम्ब निर्मितीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त केले. हिंदू संघटनांमध्ये महत्त्वाच्या पदांवर नियुक्त असलेल्या व्यक्तींवर हल्ला करण्यासाठी पीएफआय उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाताची तयारी करत होती. (UP STF get Shocking information about PFI, 'funding' coming from outside countries)

अटक केलेले दोघेजण केरळचे रहिवासी आहेत. अंसाद बदरुद्दीन आणि फिरोज खान अशी त्यांची नावं असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये मागील काही दिवसांत झालेल्या हिंसक घटनांमध्ये पीएफआय ही संघटना सक्रीय होती. याच कारणामुळे पीएफआय संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची सखोल चौकशी सुरू केली आहे. 

पीएफआय उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमध्ये स्वतःचे मोठे नेटवर्क विकसित करत होती. या नेटवर्कशी थेट संबंध असलेले अंसाद बदरुद्दीन आणि फिरोज खान यांना अटक करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांच्या चौकशीतून पीएफआय संघटनेच्या उद्योगांची आणखी माहिती हाती येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पीएफआय या संघटनेला विदेशातून कोणकोणत्या व्यक्ती आणि संस्था, संघटनांकडून पैसा येत होता याची माहिती जाणून घेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

विदेशातून येणाऱ्या पैशांवर चालते पीएफआय

बंदी असलेली पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) ही संघटना विदेशातून ठराविक व्यक्ती, संस्था आणि संघटनांकडून सातत्याने मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर भारतात लपूनछपून कारवाया करत आहे. भारतात हिंसा करणे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे या एकाच उद्देशाने बंदी असलेली पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) ही संघटना सक्रीय आहे. या प्रकरणात केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर चौकशी करत आहेत. ही चौकशी सुरू असल्यामुळे विदेशातून पीएफआयला पैसे देणाऱ्या कोणाचेही नाव सध्या जाहीर करत नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. 

पीएफआयकडून जप्त केले बॉम्ब निर्मितीचे साहित्य

बंदी घातलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या अंसाद बदरुद्दीन आणि फिरोज खान या दोघांकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब निर्मितीचे साहित्य जप्त केल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स - एसटीएफ) दिली. साहित्याचे प्रमाण बघितले तरी पीएफआय किती घातपात करण्याची तयारी करत होती याचा अंदाज येतो, असे पोलिसांनी सांगितले. अंसाद बदरुद्दीन आणि फिरोज खान या दोघांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वेगवेगळ्या दिवसांची बारा तिकिटे जप्त करण्यात आली. ही तिकिटे वेगवेगळ्या मार्गांवरील गाड्यांची होती. यावरुन पीएफआय नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी किती ठिकाणी प्रयत्न करत होती हे लक्षात येते, असे पोलिसांनी सांगितले. पीएफआय संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. 

केरळमध्ये सक्रीय आहे पीएफआय

केरळमध्ये पीएफआय मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. पीएफआयचे सदस्य अलिकडेच परदेशी जाऊन आले असल्याची माहिती चौकशीत उघड झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स - एसटीएफ) सांगितले. पीएफआयच्या विदेशात जाऊन आलेल्या प्रतिनिधींमुळेच विदेशातून येणाऱ्या पैशांचा ओघ वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेला पैसा भारतात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खर्च होत असल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीएफआयचा सीएए विरोधी दंगलीत तसेच शेतकरी आंदोलनात हात

याआधी दिल्लीत सीएए विरोधात शाहीन बाग येथे मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर दिल्लीच्या ईशान्येकडील भागात (North East Delhi) दंगल झाली होती. या दंगलीत पीएफआय सक्रीय होती. सध्या दिल्लीच्या सीमावर्ती भागात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात खलिस्तान समर्थक आणि पीएफआय यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच पुरेसे ठोस पुरावे हाती येतील असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी