Dawood Ibrahim: दाऊद पाकिस्तानातच, अमेरिकेनेही दिला दुजोरा

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 03, 2019 | 11:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

dawood Ibrahim: दाऊद पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे दाऊद संदर्भातील भारताच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

dawood ibrahim
दाऊद पाकिस्तानातच; अमेरिकेनेही दिला दुजोरा  |  फोटो सौजन्य: PTI

नवी दिल्ली: मुंबईतील १९९३ बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने अनेकवेळा केला आहे. पण, पाकिस्तानने हा दावा तितक्याच वेळा फेटाळला आहे. दाऊद सध्या कराचीमध्ये राहत असून, तिथूनच तो भारत, आखाती देश, अमेरिका, युरोपमध्ये गुन्हेगारी कारवाया करत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याच्या  भारताच्या दाव्याला आता अमेरिकेकडूनही दुजोरा मिळाला आहे. दाऊदचा एक साथीदार जबीर मोती (वय ५१) याला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदच्या टोळीने अमेरिकेतही अमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीसारखे गुन्हे केले आहेत. या पार्श्वभूीवर अमेरिकेने मोतीचे प्रत्यार्पण करण्याची मागणी ब्रिटनकडे केली आहे. त्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अमेरिकेच्या वकिलांनी दाऊद पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता दाऊद संदर्भातील भारताच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे दाऊद पाकिस्तानात नाही, असे सांगणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

दाऊदने अमेरिकेतही पसरले पाय

जबीर मोती संदर्भातील सुनावणीच्यावेळी अमेरिकेकडून जॉन हार्डी वकील म्हणून काम पाहत आहेत. मोतीच्या प्रत्यार्पणाविषयी सुनावणी दरम्यान, हार्डी यांनी अमेरिकेच्या एफबीआयने दाऊदच्या डी-कंपनी विरोधात चौकशी सुरू केली आहे. सध्या दाऊद पाकिस्तान, भारत आणि आखाती देशांमध्ये आपल्या गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार हार्डी यांनी म्हटले आहे की, डी कंपनीचा प्रमुख दाऊद इब्राहिमच आहे. जो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. त्याचा भाऊ अनीस आणि तो १९९३च्या बॉम्ब स्फोटांनंतर पाकिस्तानात जाऊन राहिले आहेत. दाऊदची डी-कंपनी गेल्या दहा वर्षांपासून अमेरिकेत बेकायदा पैशांचे व्यवहार, अमली पदार्थांची तस्करी तसेच खंडणीची कामे करू लागली आहे. त्यावर अमेरिकी प्रशासन गंभीर असून, दाऊदचा सहकारी मोतीच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.

कोण आहे जबीर मोती?

ब्रिटनमध्ये पकडण्यात आलेला जबीर मोती हा कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दाऊदच्या अतिशय जवळच्या व्यक्तींमध्ये जबीर मोतीचा समावेश आहे. डी कंपनीमध्ये त्याचे चांगले वजन होते. दाऊदसाठी गोपनीय मिटिंग आयोजित करण्याचे काम मोती करत होता. त्याच्या फोन आणि ई-मेलवरून साधण्यात आलेल्या संवादाचा एफबीआयने अनेक वेळा तपास केला आहे. त्याच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात आले आहेत. जबीर मोतीवाला, जबीर सिद्दीकी अशा वेगवेगळ्या नावांनी जबीर मोती ओळखला जातो. गेल्या वर्षी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला ब्रिटनमध्ये अटक केली होती. त्यानंतर अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या खटल्यात मोतीच्या वकिलांनी त्याची बाजू मांडली आहे. मोती सध्या मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो प्रत्यार्पणास तयार नाही, असे मत मोतीच्या वकिलांनी मांडले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी