Uttar Pradesh CM Yogi Adityanath says after Ayodhya and Kashi now preparations for Mathura and Vrindavan : अमरोहा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमरोहा जिल्ह्यात अनेक विकास योजनांचे उद्घाटन, लोकार्पण आणि शिलान्यास केला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या आणि काशी पाठोपाठ मथुरा वृंदावनमध्ये भव्य मंदिर निर्माण करणार असल्याचे जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने अयोध्येत रामाचे तर काशीत विश्वनाथाचे भव्य मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. दोन्ही ठिकाणी वेगाने काम सुरू आहे. हे प्रकल्प सुरू असतानाच विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली. अयोध्या आणि काशी पाठोपाठ मथुरा वृंदावनमध्ये भव्य मंदिर निर्माण करणार; असे मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले. याआधी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाच्या असलेल्या कावड यात्रेविषयी मुख्यमंत्री बोलले.
श्रावण बाळाने आईवडिलांना पुण्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांना कावडीच्या दोन तागड्यात बसवले आणि ती कावड घेऊन तीर्थस्थळांची यात्रा केली. यातून प्रेरणा घेऊन उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा सुरू झाली. कावड यात्रेत उत्तर प्रदेशमधील पवित्र नद्यांचे पाणी घेऊन भाविक आपापल्या घरी जातात. घरात त्या पाण्याची पूजा केली जाते. नंतर हे पाणी तीर्थ म्हणून प्यायले जाते. पण मागील काही वर्षांपासून सुरक्षेचे कारण पुढे करुन कावड यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये आयत्यावेळी बदल केले जाते होते अथवा यात्रा एखाद्या टप्प्यावर रद्द केली जात होती. पण योगी सरकार आल्यापासून कावड यात्रा व्यवस्थित सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेत कावड यात्रेविषयी बोलले.
कावड यात्रा विना व्यत्यय सुरू आहे यात कोणताही अडथळा येऊ दिलेला नाही; असे मुख्यमंत्री म्हणाले. कायदा हाती घेण्यासाठी बदनाम असलेल्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. राज्यात कायद्याचे राज्य आहे; असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
सरकारी नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेतला भेदभाव थांबला. प्रक्रियेत पारदर्शकता आली. लसीकरण मोहिमेमुळे राज्यातील हजारो नागरिक कोरोनापासून सुरक्षित झाले. लसीकरण मोहीम सुरू असल्यामुळे आणखी अनेकजणांना कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील विकास कामांना गती आली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्याचा विकास प्रगतीपथावर आहे आणि यापुढेही राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. उत्तर प्रदेशचे २५ कोटी नागरिक माझ्यासाठी एक कुटुंब आहे; असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.