Uttar Pradesh Election: योगी सरकारवर 'संक्रात', आता तब्बल १८ मंत्री सोडणार भाजपची साथ!; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा (Assembly) निवडणुकीच्या (Election) आखाड्यात भाजपला (BJP) आपल्याच नेते मंडळींकडून दगा फटका होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत योगी सरकारमधील (Yogi government) २ मंत्री आणि ३ आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

18 ministers in the Yogi government will resign
योगी सरकारमधील १८ मंत्री राजीनामे देणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील.
  • गेल्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांनी भाजपसोबत आघाडी केली होती.
  • भाजप ५० जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही- राजभर

Uttar Pradesh Assembly Election : लखनऊ: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा (Assembly) निवडणुकीच्या (Election) आखाड्यात भाजपला (BJP) आपल्याच नेते मंडळींकडून दगा फटका होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत योगी सरकारमधील (Yogi government) २ मंत्री आणि ३ आमदारांनी भाजपला रामराम ठोकला आहे. या डॅमेज कंट्रोलसाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशातच ओबीसी नेते व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (Suheldev Bharatiya Samaj Party) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भाजपची अजून धडकी भरवणारा खळबळजनक दावा केला आहे. 

योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यासोबत त्यांच्या तीन समर्थक आमदारांनीही भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर बुधवारी दारा सिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजकीय भूकंपावर ओमप्रकाश राजभर यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. फक्त दावाच नाही तर त्यांनी चक्क निश्चित तारीख देखील सांगितली आहे. गेल्या काही दिवसांपासून युपीमधील भाजपची स्थिती पाहिली तर राजभर यांचा दावा हा खरा वाटू लागला आहे. 

दरम्यान, राजभर हे तेच आहेत ज्यांनी २०१९मध्ये भाजपची साथ सोडली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. त्यांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. राजभर हे जहुराबाद येथून निवडून आले होते. योगी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही दिले गेले होते. मात्र २०१९ मध्ये राजभर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपचीही साथ सोडली होती. उत्तर प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीवर पुढे बोलताना राजभर म्हणाले, 'सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एकदोन नाही तर दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत आणि भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे', असे राजभर म्हणाले.

 '१४ तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. राज्यपालांकडे राजीनाम्यासाठी लाइन लागणार आहे. २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील', असा दावा राजभर यांनी केला. स्वामी प्रसाद मौर्य मोठे नेते आहेत. समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी एखादी भूमिका घेतल्यास समाज त्यांच्यामागे उभा राहतो. गेल्या निवडणुकीत ते भाजपसोबत गेले आणि भाजपला समाजाची साथ मिळाली. आता ते जे भूमिका घेतील त्यालाही समाजाची निश्चितच साथ मिळेल, असे नमूद करत मौर्य यांच्या नेतृत्वाचे राजभर यांनी कौतुक केले.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे, बसपा बेदखल आहे आणि भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हीच ओळखा, असे सांगत राजभर यांनी सपा आणि मित्रपक्षांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजप ५० जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी