नदीच्या पाण्यात अर्टिगा गेली वाहून; कारमधल्या 9 जणांचा मृत्यू; मुलगी थोडक्यात बचावली

जखमी मुलीला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं आहे. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Uttarakhand Ramnagar Accident
उत्तराखंडमध्ये कार गेली वाहून  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • रामनगर येथील ढेला नदीत अर्टिगा कार कोसळली.
  • या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • एकाला वाचवण्यात यश आलं आहे.

उत्तराखंड: उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. रामनगर येथील ढेला नदीत अर्टिगा कार कोसळली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. जखमी मुलीला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं आहे. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

नदीत कोसळलेल्या कारमधून सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. बुडालेली कार देखील तासाभर केलेल्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व मृत पंजाबमधील रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा-  Maharashtra Rain Update: आज राज्यातल्या 'या' भागात रेड अलर्ट... तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

रात्री उशिरा 2 वाजल्यापासून ढेला नदी परिसरात तुफान पाऊस पडत होता. या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुंडूब भरले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं हातानं इशारा करत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ही कार थांबली नाही आणि पुढे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात जाऊन बुडाली. प्रत्यक्षदर्शी देखील काशीपूरहून रामनगरला जाताना नदीचा प्रवाह पाहून थांबला होता. त्यामुळे या घटनेसंदर्भातली माहिती समजू शकली. या कारमध्ये एकूण 10 जण प्रवास करत होते, त्यापैकी एक मुलगी बचावली आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डीआयजी नीलेश आनंद भरणे यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं आहे.

या अपघातात मृत असलेले नऊ ही जण पंजाबमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कारवार पटियाला येथील आरटीओचा क्रमांक नोंदवण्यात आला आहे. ही कार ढेला येथून रामनगरच्या दिशेनं जात असताना अपघात झाला. 

सध्या घटनास्थळावर स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली आहे. स्थानिक लोकांनीही कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली. नदीच्या खडकांमध्ये ही कार जाऊन अडकली होती, त्यामुळे बाहेर काढताना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे कार काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली.  पोलीस, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक लोकांनी मिळून ही संपूर्ण बचावकार्य केलं. 

अधिक वाचा- मालेगावहून मुंबईत आले 3 ट्रक, पोलिसांनी सापळा रचत उद्धवस्त केला मोठा प्लान

एसडीएम गौरव चटवाल ​​यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सात महिला होत्या, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या कारमध्ये पटियाला येथील लोक प्रवास करत होते. मात्र मृतांपैकी दोन महिला रामनगर येथील आहेत. मृतांची ओळख पटवण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. वस्तुस्थिती नंतर स्पष्ट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी