भारत पहिल्या टप्प्यात सहा देशांना देणार कोरोना लस

भारत मदत म्हणून भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या सहा देशांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसचा पुरवठा करणार आहे.

India to supply COVID vaccine to six countries
भारत पहिल्या टप्प्यात सहा देशांना देणार कोरोना लस 

थोडं पण कामाचं

  • भारत पहिल्या टप्प्यात सहा देशांना देणार कोरोना लस
  • आणखी ३ देशांकडून परवानगी मिळताच त्यांनाही लस पुरवठा सुरू होणार
  • अनेक देश लससाठी भारताच्या संपर्कात

नवी दिल्ली: भारत मदत म्हणून भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या सहा देशांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसचा पुरवठा करणार आहे. आणखी काही देश भारताच्या संपर्कात आहेत. लवकरच या देशांना कोरोना लसचा पुरवठा करण्याबाबत भारत सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांच्या नियामक यंत्रणेकडून लवकरच भारताला कोरोना लससाठी आवश्यक ती परवानगी मिळेल. यानंतर या तीन देशांसाठी कोरोना लसच्या पुरवठ्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. (Vaccine Diplomacy: India to supply COVID vaccine to six countries; 'more will follow', hints PM Modi)

भारताला मित्र देशांकडून कोरोना लससाठी मागणी येऊ लागली आहे. भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या सहा देशांना भारताकडून मदत म्हणून कोरोना लसचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा बुधवार २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांच्या नियामक यंत्रणेकडून लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या तीन देशांना कोरोनाची लस पुरवण्याबाबतचे नियोजन केले जाईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक काढून ही माहिती दिली.

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. देशात सात महिन्यांत ३० कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना सर्वात आधी नंतर सैनिक आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी या फ्रंटलाइन वर्करना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेतील पहिल्या ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून १९ जानेवारी पर्यंत ४ दिवसांमध्ये ४ लाख ५४ हजार ४९ जणांना लस देण्यात आली. 

जेवढ्या नागरिकांना लस देण्यात आली त्यापैकी ०.१८ टक्के नागरिकांना लस घेतल्यानंतर त्रास झाला. लस घेतलेल्यांपैकी फक्त ०.००२ टक्के नागरिकांनाच जास्त त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार करावे लागले. ज्या इतर व्यक्तींना त्रास झाला त्यांना थोड्या उपचारांनंतर बरे वाटू लागले. कोणत्याही औषध आणि लसचा काही जणांना त्रास होण्याची शक्यता असते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे ही शक्यता आहे. पण त्रास झालेल्यांची संख्या लस घेणाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. लस घेणे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे. लस घेतली नाही तर शरीरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लवकर रोगप्रतिकारक शक्ती विकसित होणार नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

देशातल्या ३ हजार ६०० लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात किमान १०० जणांना लस दिली जाते. आधी सरकारी सेवेतील नंतर खासगी सेवेतील डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना लस देण्यात येईल. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसचे १ कोटी १० लाख डोस आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसचे ५५ लाख डोस भारत सरकारने खरेदी केले असून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राज्यांना पुरवले आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस पुरवण्याची व्यवस्था झाली आहे. 

कोविशिल्ड लस २०० रुपये दराने तर कोवॅक्सिन ही लस २०६ रुपये दराने उपलब्ध आहे. भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी कोवॅक्सिन ही लस ९०० ते एक हजार रुपये या दराने मार्च २०२१ पासून उपलब्ध होणार आहे. तसेच कोविशिल्ड लस ऑगस्ट २०२१ पासून एक हजार रुपये दराने बाजारात उपलब्ध होणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकाला लस खरेदी करुन डॉक्टरांच्या मदतीने लसीकरण करुन घेता येईल.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस दोन ते आठ अंश से. तापमानात दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. भारतातून कोविशिल्ड अनेक देशांना निर्यात होणार आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांच्या सरकारकडून कोविशिल्ड लसला मागणी आहे. जगभर डॉक्टर, मेडिकल स्टाफ, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने कोविशिल्ड दिली जाणार आहे. अठरा वर्षे झालेले ते पन्नाशीच्या आतले अशा मोठ्या समुदायाची मागणी सरकारी लसीकरणातून लवकर पूर्ण होणे कठीण आहे. याच कारणामुळे मार्चपासून भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन आणि ऑगस्ट महिन्यापासून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसची भारतीय बाजारात खुली विक्री सुरू होणार आहे. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे. 

भारत सरकारने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली. यानंतर एका कंपनीने सरकारी मागणीला तर दुसऱ्या कंपनीने खासगी मागणीला प्राधान्य द्यायचे अशा स्वरुपाचे नियोजन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटींपेक्षा जास्त आहे. यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे नियोजन करुन लसीकरण सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी