ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त, सर्व्हे आजपासून पुन्हा सुरू होणार

varanasi court ordered video survey of gyanvapi masjid : उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे असलेल्या ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. स्थानिक मुस्लिमांच्या विरोधामुळे रखडलेला मशिदीचा सर्व्हे आजपासून (शनिवार १४ मे २०२२) न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सुरू होत आहे.

varanasi court ordered video survey of gyanvapi masjid
ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त, सर्व्हे आजपासून पुन्हा सुरू होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त, सर्व्हे आजपासून पुन्हा सुरू होणार
  • 'कोर्ट कमिशनर'च्या देखरेखीत सर्व्हेचे काम होणार
  • सर्व्हे करून १७ मे रोजी अहवाल न्यायालयाला सादर केला जाईल

varanasi court ordered video survey of gyanvapi masjid : वाराणसी (बनारस / काशी) : उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे असलेल्या ज्ञानवापी मशिदीबाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. स्थानिक मुस्लिमांच्या विरोधामुळे रखडलेला मशिदीचा सर्व्हे आजपासून (शनिवार १४ मे २०२२) न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सुरू होत आहे. न्यायालयाने नियुक्त केलेल्या 'कोर्ट कमिशनर'च्या देखरेखीत सर्व्हेचे काम होणार आहे. सर्व्हे करून १७ मे रोजी अहवाल न्यायालयाला सादर केला जाईल. 

दररोज किमान चार तास सर्व्हेचे काम सुरू राहील. 'कोर्ट कमिशनर'च्या आदेशाने सर्व्हेचे काम सुरू करणे आणि थांबवणे या प्रक्रिया होतील. मशिदीचा संपूर्ण परिसर (इमारतीच्या आतील आणि बाहेरील), याचिकाकर्त्याने मागणी केलेल्या जागा तसेच मशिदीतले तळघर यांच्यासह संपूर्ण मशिदीचा सर्व्हे होणार आहे. न्यायालयाने 'कोर्ट कमिशनर' बदलण्याची आणि सर्व्हे स्थगित करण्याची मागणी फेटाळली आहे. 

हिंदू पक्षाकडून अंशु दुबे, विभाष दुबे, रामप्रसाद, गणेश शर्मा, रविकांत तर मुस्लिम पक्षाकडून एजाज, रईस, अखलाक, अभयनाथ, कोर्ट कमिशनर म्हणून अजय प्रताप सिंह, विशाल सिंह, अजय मिश्रा याचिकाकर्ते रेखा पाठक, हरिशंकर जैन, सीता साहू सर्व्हे टीममध्ये सहभागी होतील. प्रत्यक्ष सर्व्हे करणारे आणि पक्षपात होत नसल्याची खात्री करण्यासाठी आलेले प्रतिनिधी असे मिळून ५१ जणांची टीम सर्व्हे करणार. ज्ञानवापीभोवती सीआरपीएफ जवानांनी कडे केले आहे. कडेकोट बंदोबस्तात सर्व्हेचे काम होणार आहे. 

वाराणसीच्या ज्ञानवापी येथे आधी शिव मंदिर होते. पण या मंदिराची मोडतोड करण्यात आली. मंदिराचे रुपांतर मशिदीत करण्यात आले. मंदिरातील शिवलिंग आजही मशिदीच्या तळघरात लपवून ठेवण्यात आले आहे; असे सांगितले जात आहे. मंदिराचे रुपांतर मशिदीत केले असल्यामुळेच मशिदीच्या भिंतीवर माँ श्रृंगार गौरीच्या आकृती दिसतात. या प्रत्यक्षात मंदिराच्या भिंतीवरील आकृती आहेत; असेही सांगितले जात आहे. सर्व्हेतून काय खरे आणि काय खोटे हे पुढे येईल. 

सर्व्हेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला अथवा कोणी सर्व्हे थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात पोलीस गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहेत. या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

मशिदीच्या आवारात कुलुप लावलेल्या खोल्या / सभागृह आढळल्यास संबंधित ठिकाणी कुलुप उघडून सर्व्हे केला जाईल. कुलुपाची चावी उपलब्ध नसल्यास डुप्लीकेट चावी तयार केली जाईल किंवा कुलुप तोडून सर्व्हे केला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी