Agnipath Controversy : सैन्यभरतीशी संबंधित केंद्र सरकारने सुरु केलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून आता भाजप नेत्यांमध्येच हमरीतुमरी सुरू झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. या योजनेतून सैन्यात सहभागी होणाऱ्या तरुणांना जातीचं प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यावरून भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. आता तरुणांची जात पाहून त्यांची निवड केली जाणार का, असा सवाल वरुण गांधींनी उपस्थित केला आहे. सरकारने याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यावर आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आतापर्यंत सैन्यात कधीही जात विचारली जात नाही. सैन्यात भरती होताना आरक्षणही लागू होत नाही. असं असताना आता नेमक्या कुठल्या कारणासाठी त्यांना जात प्रमाणपत्र मागितलं जात आहे, असा सवाल वरुण गांधींनी केला आहे. आता आपण जात पाहून राष्ट्रभक्तीचं परिमाण निश्चित करणार आहोत का, असा सवाल त्यांनी केला आहे. सैन्य भरतीची प्रस्थापित पद्धत बदलल्यामुळे सैन्याच्या मनोबलावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा - मोठी बातमी ! शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, सेना खासदाराचा गौप्यस्फोट
सैन्यदलात जातीच्या आधारावर भरती केली जात आहे. याचाच अर्थ जेव्हा सैन्यातील उमेदवार निवडण्याची आणि काढून टाकण्याची वेळ येईल, तेव्हा हे निर्णय जातीच्या आधारावरच घेतले जाणार, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. “जात न पुछो साधू की लेकिन पुछो फौजी की” अशी टीका करत त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जातीनिहाय जनगणना करण्याच्या मुद्द्यावरून भाजप माघार घेते, मात्र देशासाठी जीव पणाला लावणाऱ्या सैनिकांची जात मात्र सरकार का विचारत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यापासून 75 वर्षं कधीही जातीच्या आधारे सैन्यभरती होत नव्हती. नोकरी मिळालेल्या 75 टक्के जवानांना चार वर्षात नोकरीवरून कधीही काढलं जात नव्हतं. सैन्यात आरक्षणाचा प्रश्नच नसेल, तर जात प्रमाणपत्र का मागितलं जात आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
सैन्यात भरती होण्यासाठी जे जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्याचा चुकीचा अर्थ विरोधकांकडून काढला जात असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. सैन्यभरतीबाबतची वस्तुस्थिती काँग्रेस आणि आप यांना माहित नाही काय, असा सवाल पात्रा यांनी केला आहे. कधीही जातीच्या आधारावर सैन्यभरती केली जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल करणं थांबवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, अग्निपथ योजनेबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या आहेत.