Karnataka: आधी वाकून नमस्कार केला अन् नंतर चाकू भोसकला... वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Chandrashekhar Guruji Murder Case: चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अवघ्या काही तासात अटक केली आहे.

vastu expert chandrashekhar guruji killers were arrested by karnataka police stabbed to death
Karnataka: आधी वाकून नमस्कार केला अन् नंतर चाकू भोसकला...  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • हुबळी येथील हॉटेलमध्ये वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज सकाळी चाकूने वार करून हत्या करण्यात आली
  • हत्येनंतर मारेकरी घटनास्थळावरुन फरार झाले होते
  • पोलिसांनी अनेक पथके तयार करून दोन्ही मारेकऱ्यांना अवघ्या काही तासात केली अटक

हुबळी (कर्नाटक): हुबळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करणाऱ्या दोन हल्लेखोरांना कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी अवघ्या काही तासात अटक केली. दोन्ही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना रामदुर्ग येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंतेश शिरूर आणि मंजुनाथ मारेवाड हे चंद्रशेखर गुरुजी संचलित 'सरल वास्तू'चे माजी कर्मचारी आहेत आणि त्यांनीच चंद्रशेखर यांची हत्या केली आहे. हे दोन्ही मारेकरी एका कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं.

चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या

हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम म्हणाले, 'दोन्ही आरोपींनी मंगळवारी दुपारी चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर ते राहत असलेल्या हॉटेलच्या लॉबीमध्ये चाकूने सपासप वार केले. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.' 

'याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही टीम्स तयार केल्या होत्या आणि ते माहिती गोळा करण्याचे काम करत होते. आम्ही शेजारच्या जिल्ह्यांशी माहिती शेअर केली. त्यानुसार बेळगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. त्यांना आणण्यासाठी आमची टीम तिथे गेली आहे. आरोपींचा ताबा मिळताच या प्रकरणी आम्ही त्यांची कसून चौकशी करू.' अशी माहिती पोलीस आयुक्त लाभू राम यांनी दिली. 

अधिक वाचा: CCTV: प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञांची हॉटेलमध्ये घुसून हत्या

आरोपींनी कशी केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी गेल्या चार दिवसांपासून हुबळी येथील हॉटेलमध्ये थांबले होते. मंगळवारी दोन जण त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी चंदशेखर यांना लॉबीत बोलावले. चंद्रशेखर गुरुजी लॉबीमध्ये पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट चाकूने सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. 

चंद्रशेखर गुरुजी यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळच्याच KIMS रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आले. 

पोलीस आयुक्त लाभू राम म्हणाले, 'ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलच्या लॉबी भागात काही लोकांनी त्याला बोलावलं. सुरुवातीला एका व्यक्तीने त्यांना वाकून नमस्कार केला आणि नंतर अचानक आपल्या जवळील चाकू काढून त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. दोन आरोपींनी चंद्रशेखर यांच्यावर अनेक वार केले. ज्यामुळे रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आम्ही गुन्हा नोंद केला असून आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.'

चंद्रशेखर अंगडी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक कंत्राटदार म्हणून केली होती. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर त्यांनी वास्तूचं काम सुरू केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी