Vice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान, संध्याकाळी मतमोजणी आणि निकाल; एनडीएच्या धनखरांचे पारडे जड

भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज म्हणजेच शनिवार ६ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी फक्त लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्यच (खासदार) मतदान करतात.

Vice Presidential Poll Parliamentarians to vote today
उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान
  • संध्याकाळी मतमोजणी आणि निकाल
  • एनडीएच्या धनखरांचे पारडे जड

Vice Presidential Election: नवी दिल्ली : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज म्हणजेच शनिवार ६ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी फक्त लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्यच (खासदार) मतदान करतात. यामुळे मतदान, मतमोजणी आणि निकाल या सर्व प्रक्रिया आजच होतील. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होईल. संध्याकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि यूपीएकडून माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा (margaret alva) निवडणूक रिंगणात आहेत.

सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेले जगदीप धनखर जनता दलच्या माध्यमातून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या. आमदार, खासदार, पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारच्या काळात संसदीय कामकाजाचे राज्यमंत्री अशी पदे हाताळणारे जगदीप धनखर नंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा वेगवेगळ्या काळात उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांच्या राज्यपाल होत्या. याआधी केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त सचिव पदाची जबाबदारी पण हाताळली. 

राज्यपाल पद हाताळणारे दोन ज्येष्ठ नेते निवडणूक रिंगणात असल्यामुळे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मायावती यांच्या बसपने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. खासदारांच्या दबावापोटी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. पण उपराष्ट्रपतीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. 

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत व्हिप नसतो. यामुळे या निवडणुकीत खासदार काय विचार करतात यावर निकाल अवलंबून आहे. 

लोकसभेतील ५४३ पैकी ३०३ खासदार एकट्या भाजपचे आहेत. राज्यसभेत २३७ पैकी ९१ सदस्य एकट्या भाजपचे आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८० सदस्य मतदान करणार आहेत. यात भाजपच्या सदस्यांची संख्या ३९४ आहे. एनडीएतील इतर घटक पक्ष तसेच निवडक छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे एनडीएच्या उमेदवाराच्या मतांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी