नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सायंकाळी बैठक होणार असून यात अंतीम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.
उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या होणाऱ्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतीम रूप देण्यात येणार आहे. या पूर्वी मुंबई राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकत्र भेटले होते. त्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली आणि त्यात एक मसुदा तयार करण्यात आला होता. तो मसुदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला होता. याच मसुद्यावर अंतीम चर्चा करून येत्या दोन दिवसात राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानीच भेटणार आहेत.
दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचा कोणताही प्रतिनिधी नसणार आहे. किंवा त्यांच्याशी फोनवरूनही चर्चा करण्यात येणार नाही. सुरूवातीला आघाडी म्हणून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊन मग निर्णय शिवसेनेला कळविण्यात येणार आहे. गेल्या २४ तासांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मागच्या दारातून या तीनही पक्षांची चर्चा सुरू आहे.
उद्या होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच इतर निवडणुका दोन्ही पक्ष कसे लढणार आहोत. तसेच विधानसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे, त्या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवसेनेसंदर्भातील पुढील चर्चा ही राज्यात केली जाऊ शकते.