Prayagraj Bulldozer Action : हिंसाचाराच्या मास्टरमाइंडचं घर जमीनदोस्त, प्रयागराजमध्ये जावेद मोहम्मदच्या घरावर बुलडोझर

उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार घडवण्यामागे ज्याचा हात असल्याचा संशय आहे, त्या मोहम्मद जावेदचं दोन मजली घऱ जमीनदोस्त करण्यात आलं.

Prayagraj Bulldozer Action
प्रयागराजमध्ये दंगलीच्या मास्टरमाईंडचं घर जमीनदोस्त  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हिंसाचारातील प्रमुख आरोपीच्या घरावर बुलडोझर
  • तीन जेसीबींनी पाडलं संशयित आरोपीचं घर
  • नोटिशीला उत्तर न दिल्यामुळे प्राधिकरणाची कारवाई

Prayagraj Bulldozer Action | उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) आरोपी मोहम्मद जावेदच्या (Mohammad Javed) घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जावेदवर कारवाई होणार आणि त्याला धडा शिकवला जाणार, याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून त्याचा दोन मजली बंगला जेसीबीच्या आणि बुलडोझरच्या साहाय्यानं पाडण्यात आला आहे. रविवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या अटालामध्ये झालेल्या हिंसाचाराचा जावेद मोहम्मद हा मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे. सध्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या जावेदवर न्यायालयात खटला सुरू आहे. हिंसाचाराला पाठिंबा देणाऱ्या आणि हिंसाचार भडकावणाऱ्या जावेदच्या घरावर कारवाई करण्यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. घर पाडण्यासाठी 3 जेसीबी मशीन बोलावण्यात आले होते. त्याचं दोन मजली घर पाडताना कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले होते. स्वतः जावेद तुरुंगात असला तरी ही कारवाई रोखण्यासाठी तो हिंसाचाराचा वापर करू शकतो, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे कारवाईत कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी शक्य ती सर्व खबरदारी पोलिसांनी घेतली होती. 

तीन यंत्रांनी पाडली दुमजली इमारत

उत्तर प्रदेशच्या अटाला परिसरात असणारं मोहम्मद जावेदचं दोन मजली घर तीन जेसीबीच्या साहाय्यानं पाडण्यात आलं. 5 तास ही कारवाई सुरू होती. ही कारवाई करताना आजूबाजूच्या घरांना त्याची झळ पोहोचणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. स्थानिकांनी कुठलाही विरोध न केल्यामुळे ही कारवाई सलग सुरू राहिली आणि पाच तासांत पूर्ण झाली. 

अधिक वाचा - Sidhu Moosewala Murder : मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधवला गुजरातमध्ये अटक; हत्येसाठी घेतली होती ३ लाख रुपयांची सुपारी

अशी झाली कारवाई

प्रयागराज विकास प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी जावेदला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. 24 मे रोजी जावेदनं सुनावणीसाठी हजर राहणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात तो गैरहजर राहिला. जावेदनं प्राधिकरणाची परवानगी न घेताच 250 फूट बाय 60 फुटाचं बांधकाम केल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडून कुठलंही समाधानकारक उत्तर न आल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा प्राधिकरणानं केला आहे. ज्या भागात अतिरिक्त बांधकाम करण्यात आलं आहे, तेवढं पाडून टाकावं आणि प्राधिकरणाला याची सूचना द्यावी, असं आवाहनदेखील जावेदला करण्यात आलं होतं. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. 

अधिक वाचा - Do Aliens Really exist? : खरंच एलियन्स असतात का? नासाच्या प्रमुखांनी दिलं एका शब्दात उत्तर

जेएनयुत पडसाद

मोहम्मद जावेदची मुलगी आफरीन जावेद ही जेएनयुची विद्यार्थिनी आहे. योगी सरकारच्या बुलडोझर धोरणाविरोधात जेएनयुमध्ये निदर्शनं करण्यात येणार आहेत, त्यात तिचा सहभाग असेल. आपल्या वडिलांना कायदेशीर सल्ले देण्याचं काम आफरीन करते, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून गरज पडल्यास तिलाही अटक करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. आफरीन ही CAA विरुद्धच्या आंदोलनातही सक्रीय होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी