water bill of more than 20 lakh rupees negligence of teacher school pay heavy bill : शिक्षकाच्या चुकीमुळे शाळेला २० लाख ६६ हजार ८१ रुपयांचे पाणीबिल भरावे लागले. एवढे मोठे पाणीबिल भरण्याव्यतिरिक्त शाळा व्यवस्थापनाला संपूर्ण शहराची माफी मागावी लागली. शाळा व्यवस्थापनाने शिक्षा म्हणून संबंधित शिक्षक तसेच शाळेतील स्विमिंग पूलची जबाबदारी सांभाळणाऱ्या दोन अधिकारी अशा तीन जणांना दोषी ठरविले आहे. या तिघांना मिळून पाणीबिलाच्या रकमेएवढा दंड शाळा व्यवस्थापनाकडे जमा करुन पावती घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
स्विमिंग पूलमध्ये सतत वाहते पाणी राहिले तर कोरोना विषाणू त्या पाण्यात टिकाव धरणार नाही, असा गैरसमज शिक्षकाने करुन घेतला होता. या गैरसमजातून त्याने शाळेच्या स्विमिंग पूलचा नळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शाळा कर्मचाऱ्यांनी नळ बराच वेळ सुरू असल्याचे पाहून बंद केला. पण बंद नळ पाहून चिडलेल्या शिक्षकाने पुन्हा जाऊन नळ सुरू केला आणि पाणी वाहू दिले. यामुळे जून २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत नळातून सुमारे चार हजार टन पाणी वाहून गेले. एवढ्या पाण्यात शाळेचा स्विमिंग टँक किमान अकरा वेळा पूर्ण भरता आला असता. हे पाणी वाया गेल्यामुळे शहराच्या पाणी साठ्यातील चार हजार लिटर शुद्ध पाणी विनावापर गटारात गेले. पाण्याचे बिल आले त्यावेळी चक्रावलेल्या शाळा प्रशासनाने स्विमिंग टँकची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकाला आणि दोन अधिकाऱ्यांना बोलावले. जाब विचारला त्यावेळी शिक्षकाने चुकीची कबुली दिली. अखेर शाळा प्रशासनाने पाणीबिल भरले आणि पाणी वाया घालविल्याप्रकरणी शहराची माफी मागितली. तसेच स्विमिंग टँकची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकाला आणि दोन अधिकाऱ्यांना पाणीबिलाच्या रकमेएवढा दंड आकारला. दंड भरा आणि पावती घेऊन जा असे शाळा व्यवस्थापनाने स्विमिंग टँकची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकाला आणि दोन अधिकाऱ्यांना बजावले.