दाट धुक्याने केला घात, भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू 

Road accident in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये एका भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. 

west bengal accident
दाट धुक्याने केला घात, भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये भीषण अपघात
  • डंपरने दिलेल्या धडकेत १३ जणांचा मृत्यू
  • दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे हा अपघात झाला

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal)  दाट धुक्यामुळे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात (Road accident) झाला आहे. प. बंगालमधील जलपाईगुडीतील (Jalpaiguri) धुपगुडी भागात झालेल्या भीषण अपघातात तब्बल १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण जखमी देखील झाले आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एक डंपर मयनातलीकडे जात होता.  दरम्यान, दृश्यमानता कमी झाल्यामुळे डंपरने अनेक वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, या अपघातात बळी पडलेले लोक एका विवाह समारंभातून आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. 

या भीषण अपघातानंतर अनेक स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे हे अद्याप तरी सांगता येणार नाही. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात दृश्यमानता कमी असल्यामुळे झाला असावा. पण सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, काल (मंगळवार) गुजरातमधील सूरत येथे देखील एका भीषण अपघातात १३ मजुरांना आपला जीव गमावावा लागला होता. रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या काही मजुरांना डंपरने चिरडले. हे सर्वच्या सर्व मजूर राजस्थानमधील होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी