Article 370 : जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) कलम 370 (Article 370) रद्द होण्याच्या घटनेला आज बरोबर तीन वर्षं (Three years) पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारताच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना (Historic incidence) होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षात जम्मू काश्मीरमधील परिस्थिती वेगाने बदलत चालली आहे. वर्षानुवर्षं रखडून राहिलेली अनेक कामं आता मार्गी लागत असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र त्याचवेळी कलम 370 हटवण्यामुळे पोटदुखी झालेल्या पाकिस्तानधार्जिण्या शक्तींकडून काश्मीर अशांत करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व संशयितांवर नजर ठेवण्यात येत असून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सैन्य कारवाया सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
2019 साली कलम 370 हटवण्यात आलं आणि त्यानंतर जम्मू काश्मीर ही राज्यं केंद्रशासित प्रदेश बनली. एकीकडे एक वर्ग हे कलम हटल्याचा आनंद व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे खोऱ्यातील अनेकजण या दिवसाला ‘काळा दिवस’ म्हणत आहेत. जम्मू काश्मीरमधील काहीजणांचा कलम 370 हटवण्याला आजही विरोध आहे, तर काहीजणांसाठी मात्र हा भारताच्या स्वातंत्र्यदिनाअगोदर येणारा जम्मू काश्मीरचा स्वातंत्र्यदिन आहे. विशेषतः पाकिस्तानातून आलेल्या अनेक विस्थापितांना हा मोठा दिवस वाटतो.
अधिक वाचा - धो-धो पावसात घसरले ट्रेनचे इंजिन, ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे वाचला अनेकांचा जीव
अधिक वाचा - CJI रमणांचा ठरला उत्तराधिकारी!, जाणून घ्या कोण आहे उदय लळित जे बनू शकतात सरन्यायाधीश
कलम 370 हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. सर्व भागात जमावबंदी आणि संचारबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू हे निर्बंध कमी करण्यात आले आणि नजरकैदेत ठेवलेल्या राज्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. कलम 370 आणि 35(A) रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना मिळाली आणि हळूहळू पर्यटकांची पावलं काश्मीरकडे पुन्हा वळायला सुरुवात झाली आहे. पायाभूत सुविधांचा विकास, वाढत चाललेली कनेक्टिव्हीटी आणि कायदा सुव्यवस्थेमुळे आता पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.
अधिक वाचा - CAT: न्यायमूर्ती रणजित मोरे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली होती. मात्र गेल्या तीन वर्षात जवळपास सर्व दहशतवादी हल्ले परतवून लावण्यात भारताला यश मिळालं आहे. आता या कुरघोड्या कमी झाल्या आहेत. मात्र तरीही सुऱक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून काश्मीर भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत.