National Herald Case : 11 तासांपासून ताठ बसला आहात, कुठून येतं एवढं धैर्य, ED अधिकाऱ्यांचा राहुल गांधींना सवाल, विचार करून दिलं उत्तर

तुम्ही गेल्या अकरा तासापासून आमच्यासमोर बसला आहात तरीही अजून एकदम फ्रेश आहात आणि ताठ बसला आहात. हा फ्रेशनेस आणि धैर्य कुठून येतं, असा सवाल ED अधिकाऱ्याने राहुल गांधींना विचारला.

National Herald Case
एवढं धैर्य येतं कुठून? ED अधिकाऱ्याचा राहुल गांधींना सवाल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ईडी अधिकाऱ्याने राहुल गांधींना विचारला प्रश्न
  • "11 तासांनंतरही तुम्ही एवढे ताठ बसला आहात, एवढे फ्रेश कसे?"
  • राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना सांगितला किस्सा

National Herald Case | नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधींची पाच दिवस चौकशी करण्यात आली. एकूण 40 तास राहुल गांधींची चौकशी झाली. या चौकशीत नेमकं काय घडलं, यातील सर्वच बाबी राहुल गांधींनी जाहीर केल्या नसल्या, तरी काही प्रसंग मात्र कार्यकर्त्यांसोबत शेअर केले. काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या गप्पाांदरम्यान ते बोलत होते. 

अधिकाऱ्याचा ‘तो’ प्रश्न

एक दिवस चौकशी सुरू असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला आपल्याला एका अधिकाऱ्यानं तो प्रश्न विचारला, असं राहुल गांधी म्हणाले. गेल्या 11 तासांपासून तुम्ही इथं बसले आहात. अजूनही तसेच ताठ बसून आहात आणि कुठलाही थकवा जाणवत नाही. यामागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न त्या अधिकाऱ्याने विचारला. मी विपश्यना करतो, हेच त्यामागचं कारण आहे, असं उत्तर द्यावं असं सुुुुरुवातीला माझ्या मनात आलं. यापुढेही दहा तास याच उत्साहानं मी काम करू शकतो, असं त्यांना सांगावं, असं मनात होतं. मात्र नंतर हे बळ कार्यकर्त्यांचं असल्याचा साक्षात्कार झाला. 

अधिक वाचा - शिवसेनेच्या बंडखोरांना बंगालमध्ये पाठवा, चांगला पाहुणचार करतो', ममता बॅनर्जींचे आवाहन

मी एकटा नव्हतो

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, “चौकशी सुरू असलेल्या खोलीत शरीराने मी एकटा होतो, मात्र प्रत्यक्षात मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता उभा होता. तुम्ही एका व्यक्तीला थकवू शकता. पण लाखो कार्यकर्ते आणि नेत्यांना थकवू शकत नाही. फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं होते, असं नाही. तर मोदी सरकारविरोधात जो कुणी धैर्यानं लढत आहे, त्यातील प्रत्येकजण माझ्यासोबत होता. 

पक्षामुळे थकवा येत नाही

काँग्रेस पक्ष आपल्याला कधीच थकू देत नाही आणि धैर्यदेखील देतो, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. पक्षातूनच आम्हाला ताकद मिळते आणि आम्ही लढत राहतो. फक्त मनापासून हात जोडा, माथा टेका आपोआप प्रत्येकामध्ये धैर्य येईल, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण हे पाचही दिवस तुम्ही सर्वजण माझ्यासोबत ईडी कार्यालयात हजर होता, असंही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. 

अधिक वाचा - बंडखोरीमागे 'भाजप'चा हात असलेला Exclusive व्हिडिओ समोर 

‘अग्निपथ’वरून मोदींवर टीका

चीनचं सैन्य आपल्या भूमीवर येऊन बसलं आहे. मोदीजी, खरी देशभक्ती ही सैन्याला मजबूत करण्यात आहे, मात्र तुम्ही तर नवी धोकेबाजी करून देशाला कमजोर करत आहात. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही तरूणांसोबत त्यांच्या आंदोलनात आहोत. तुम्हाला अग्निपथ योजना रद्द करावीच लागेल, याची खात्री बाळगा, असं आव्हानही राहुल गांधींनी दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी