ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी ट्वीट केला संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारताने ब्राझिलला लसची निर्यात सुरू केली आहे. आतापर्यंत ब्राझिलमध्ये २० लाख डोस पोहोचवण्यात आले आहेत.

With a Hanuman image, Brazil President Bolsonaro thanks PM Modi for COVID vaccines
ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी ट्वीट केला संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो 

थोडं पण कामाचं

  • ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी ट्वीट केला संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो
  • कोविशिल्डची निर्यात सुरू, ब्राझिलला २० लाख डोस पोहोचले
  • ब्राझिलची लोकसंख्या २१ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त

रिओ दी जनेरो: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारताने ब्राझिलला लसची निर्यात सुरू केली आहे. आतापर्यंत ब्राझिलमध्ये २० लाख डोस पोहोचवण्यात आले आहेत. लवकरच आणखी डोस पुरवले जातील. भारतातून लसचा पुरवठा सुरू झाल्यावर ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना टॅग करुन एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लक्ष्मणासाठी संजिवनी घेऊन येणाऱ्या हनुमानाचा फोटो वापरला आहे. लस पुरवठ्यासाठी ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी भारताचे जाहीर आभार मानले. (With a Hanuman image, Brazil President Bolsonaro thanks PM Modi for COVID vaccines)

कोविशिल्डची निर्यात सुरू, ब्राझिलला २० लाख डोस पोहोचले

ब्राझिलमध्ये आतापर्यंत ८६ लाख ९९ हजार ८१४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख १४ हजार २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या बाबतीत ब्राझिल जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक कोरोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तिथे आतापर्यंत ४ लाख २० हजार ९१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लसीकरण तातडीने सुरू करण्यात आले. चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोना व्हॅक लसद्वारे लसीकरण करण्याचा निर्णय झाला. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यात सायनोव्हॅक कंपनीचा वेग कमी पडत आहे. यामुळे वेगाने लसीकरण करणे कठीण झाले आहे. या अडचणीवर उपाय म्हणून ब्राझिलने भारतातून कोविशिल्डचे डोस मागवले आहेत. आतापर्यंत ब्राझिलमध्ये २० लाख डोस पोहोचवण्यात आले आहेत.

ब्राझिलची लोकसंख्या २१ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त

ब्राझिलची लोकसंख्या २१ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे वेगाने मृत्यू होत असल्यामुळे ब्राझिल सरकारने लसीकरण मोहीम तातडीने राबण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने ब्राझिलमधील प्रकल्पात लसचे ६० लाख डोस तयार केले आहेत. पण ब्राझिल सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी नागरिकांना लस देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी मागणीपेक्षा कमी लस उपलब्ध असल्यामुळे ब्राझिल सरकारने भारतातून तातडीने कोविशिल्डचे डोस मागवले आहेत. 

कोविशिल्डचे १० कोटी आणि चीनच्या कंपनीच्या लसचे ५ कोटी डोस

कोविशिल्डचे १० कोटी आणि चीनच्या कंपनीच्या लसचे ५ कोटी डोस यांच्या माध्यमातून ब्राझिल देशात लसीकरण करणार आहे. नंतर लस व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन दिली जाईल. नागरिक खुल्या बाजारातून खरेदी करुन डॉक्टरांकडून लस टोचून घेतील. ब्राझिलची मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातून सिरमने आतापर्यंत २० लाख डोस रवाना केले आहेत. आणखी पुरवठा लवकरच होणार आहे.

भारत मदत म्हणून ६ देशांना देतोय कोरोनाची लस

ब्राझिलला निर्यात करण्याव्यतिरिक्त भारताने मदत म्हणून भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या सहा देशांना कोरोना लसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी काही देश भारताच्या संपर्कात आहेत. लवकरच या देशांना कोरोना लसचा पुरवठा करण्याबाबत भारत सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांच्या नियामक यंत्रणेकडून लवकरच भारताला कोरोना लससाठी आवश्यक ती परवानगी मिळेल. यानंतर या तीन देशांसाठी कोरोना लसच्या पुरवठ्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी