'भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देखील आमचाच होईल'

BJP Chandrakant Patil: राज्यात भाजपचंच सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री देखील भाजपचाच असेल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

without bjp no government can be formed in the maharahstra CM will be our too said bjp leader chandrakant patil 
'भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देखील आमचाच होईल'  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • 'सध्याच्या राजकीय घडामोडीवर आमची पूर्ण नजर आहे'
  • राज्यात भाजपचंच सरकार येईल, चंद्रकांत पाटलांचा दावा
  • कडबोळं सरकार राज्याचं भलं करु शकणार नाही, चंद्रकांत पाटलांची महाशिवआघाडीवर टीका

मुंबई: 'ज्यांच्याकडे ११९ जागा आहेत त्यांचंच सरकार येईल. कारण कडबोळं सरकार काही राज्याचं भलं करु शकणार नाही.' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटलांनी दावाही केला आहे की, 'राज्यात भाजपचंच सरकार येईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल.' त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपकडून देखील सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपने मुंबईत सध्या चिंतन बैठक आयोजित केली आहे. ही चिंतन बैठक तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार सध्या हे मुंबईत दाखल झाले आहेत. 

आजच्या दिवसभराच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील असं म्हणाले की, 'भाजपचं नेतृत्व असणारं सरकारच राज्यात स्थापन होईल. भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊन शकत नाही. ज्यांच्याकडे ११९ जागा आहे त्यांचं सरकार बनेल. त्यामुळे मुख्यमंत्री देखील आमचाच असेल.'  

दरम्यान, याचवेळी चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीतील काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देखील माहिती दिली. 'राज्यात आम्ही १६४ जागी निवडणूक लढवली. त्यात आम्ही ५९ जागांवर पराभूत झालो. पण ५९ जागांपैकी ५५ जागांवर आम्ही दुसऱ्या स्थानी होतो. या संपूर्ण निवडणुकीत भाजप हा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. कारण सर्व पक्षांपेक्षा अधिक मतदान हे भाजपलं झालं आहे. या निवडणुकीत असं म्हटलं जात होतं. की आम्ही अनेक नेते बाहेरुन घेतले आणि त्यांचा पराभव झाला. तर तुम्हाला सांगू इच्छितो. १६४ पैकी फक्त २४ जण हे इतर पक्षातून भाजपमध्ये आले. त्यापैकी १६ जण हे विजयी झाले आहेत.' 

'सध्या भाजप आजच्या बैठकीतून संघटना मजबूत करण्याविषयी चर्चा सुरु आहे.  राज्यात संघटना कशा पद्धतीने आणखी मजबूत करता येईल यासाठी काही गोष्टी निश्चित करण्यात येत आहेत. याच बैठकीत विजयी जागा आणि हरलेल्या जागांबाबत देखील चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालाची मीमांसा करण्यासाठी भाजपकडून आता प्रत्येक जिल्ह्यात १ समीक्षक नेमण्यात येणार आहे.' असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. 

दरम्यान, याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावर टीकाही केली. 'सध्याच्या राजकीय घडामोडीवर आमची नजर आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण कडबोळं सरकार हे राज्याचं भलं करणार नाही.' असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी