Gurugram Crime: एक्स-रे काढायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 27, 2019 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

हरियाणाच्या गुरूग्राम इथं एक्स-रे काढायला आलेल्या एका महिलेसोबत अश्लील वागणूक केली गेल्याची घटना समोर आलीय. हॉस्पिटल प्रशासनानं मात्र महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...

Gurugram Crime
एक्स-रे काढायला गेलेल्या महिलेसोबत हे काय घडलं  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • हॉस्पिटलच्या टेक्निशियननं महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप
  • महिला गुंगीत असल्याचा एक्स-रे काढतांना घेतला फायदा
  • तर बिल कमी करावं म्हणून महिलेनं रचला डाव, हॉस्पिटल प्रशासनाचा आरोप

गुरूग्राम: देशाची राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गुरूग्राम इथली एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका महिलेनं खाजगी हॉस्पिटलमधील टेक्निशियननं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलेचं म्हणणं आहे की, ती जेव्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाली होती. तेव्हा एक्स-रे रूममध्ये टेक्निशियननं तिला वाईट पद्धतीनं स्पर्श केला, तेव्हा महिला अर्धवट शुद्धीत होती. तिच्यावर गुंगी होती. त्यामुळे तिला आपल्यासोबत काहीतरी वाईट झाल्याचं कळत होतं पण ती विरोध करू शकत नव्हती आणि कुणाला बोलावूही शकत नव्हती. मात्र तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर महिलेनं याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितलं.

हे प्रकरण गुरूग्रामच्या सेक्टर ५६ मधील असल्याचं सांगितलं जातंय. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉस्पिटलच्या टेक्निशियन विरोधात तक्रार दाखल केली आहे. पण याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडूनही महिलेविरोधात एक एफआयआर दाखल केली गेलीय. यात महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या प्रमुखांसोबत गैरवर्तन केलं आणि शिवीगाळ करत हॉस्पिटलच्या संपत्तीचं नुकसान केलं, असा आरोप केला गेलाय.

हॉस्पिटल प्रशासनानं आरोप केलाय की, महिला संपूर्ण बिलामध्ये भरघोस डिस्काऊंट मागत होती. हॉस्पिटलनं आधीच त्यांना ३७००० रुपयांच्यावर बिलावर तब्बल ५ हजार रुपयांची सूट दिलेली होती. मात्र महिला २० हजार रुपयांची सूट मागत होती. मात्र महिलेची मागणी मान्य न केल्यानं तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला आणि डॉक्टरांसोबत गैरवर्तन केलं.

मात्र याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या टेक्निशियनवर कारवाई न केल्याचा आरोप केलाय.

महिलेला रविवारी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. महिलेनं विषप्राषन केल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं असल्याचं कळतंय. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. हॉस्पिटल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय.

दरम्यान, अशाचप्रकारची एक घटना गुजरातच्या अहमदाबाद इथं याच महिन्यात घडली होती. तिथं हॉस्पिटलमध्ये एका एजंसीद्वारे काम करणाऱ्या दोन महिलांनी डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली होती. डॉक्टरांनी जबरदस्तीनं संबंध बनविण्यासाठी दबाव टाकल्याचा या महिलांचा आरोप होता. हे प्रकरण खूप गाजलं होतं. यानंतर आरोपी डॉ. अनिल सहर यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता, त्यांनी रागात माध्यम प्रतिनिधींना धक्का दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर चिडलेल्या पीडित महिलांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात जोरदार प्रदर्शन करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून संपूर्ण वातावरण शांत केलं होतं.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी