स्वत:ला पेटवून घेत महिलेची आत्महत्या, पतीने व्हिडिओ शूट करुन केला व्हायरल

Crime news: एका महिलेने स्वत:ला पेटवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा पती तिला वाचवण्याऐवजी व्हिडिओ शूट करत असल्याचं समोर आलं आहे. 

Fire
प्रातिनिधीक फोटो  

जयपूर : एका विवाहित महिलेने कथितपणे अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना राजस्थानमधील झुंझुन जिल्हात घडली आहे. घटनेवेळी तिचा पती सुद्धा तेथे उपस्थित होता आणि त्याने तिचे प्राण वाचवण्याऐवजी चक्क व्हिडिओ शूट करत असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ शूट केल्यावर त्याने आपल्या सासरच्यांना पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासरा, दीरासह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

गुढागौडजी पोलीस ठाण्याच्या अधिकारी देवी सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, या घटनेप्रकरणी मृतक महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या भावाने तिचा पती अनिल, सासरे रामचंद्र, दीर अमित, सासू बिदामी देवी, चुलत सासरे गिरधारी आणि त्यांची पत्नी प्रेम देवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध ४९८ अ (हुंडा), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना २० नोव्हेंबर रोजीची आहे. पीडित महिला गंभीर जखमी झाली होती आणि तिला उपचारासाठी जयपूर येथे हलवण्यास सांगितले होते. तिचा उपचारादरम्यान २२ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. पीडित महिलेचं शवविच्छेदन केल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. 

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी विवाहित महिलेने स्वत:ला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केली. तिच्या पतीने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि मग आपल्या मेव्हण्याला पाठवला, तर त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी