Sri Lanka Financial Crisis : शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाली सेक्स वर्कर, कुणी ओळखीचं तर येणार नाही? सतत वाटते धाकधूक

श्रीलंकेची आर्थिक स्थिती कोलमडली असून अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुणी चरितार्थ चालवण्यासाठी वेश्या व्यवसायाकडे वळत असल्याचं चित्र आहे.

Sri Lanka Financial Crisis
चरितार्थासाठी नाईलाजाने करावा लागतो वेश्या व्यवसाय  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेत 40 हजार तरुणी वेश्या व्यवसायात
  • चरितार्थ चालवण्यासाठी नाईलाजाने करतात काम
  • कुणी ओळखीचं भेटू नये, एवढीच असते प्रार्थना

Sri Lanka Financial Crisis | टाईट कपडे घालून मोबाईलमध्ये (Mobile) काहीबाही बघत बसलेला तरुणी आणि काचेच्या अलिकडून त्या मुलींकडे वखवखलेल्या नजरेनं पाहणारे चेहरे. आपल्याकडे निरखून पाहिलं जातंय, याची जाणीव असतानाही ती चेहऱ्यावर दिसू न देण्याचा आटापिटा करत आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणी आणि काचेपलिकडून तरुणी पसंत करून, काउंटरवर पैसे भरून आत प्रवेश करणारे पुरुष. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या श्रीलंकेत अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. 

मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय

श्रीलंकेत वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही. श्रीलंकेची राजधानी कोलंबोत वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा असा कुठलाही विशिष्ट परिसरही नाही. मात्र आर्थिक संकट ओढावल्यानंतर जागोजागी असणाऱ्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू झाल्याचं चित्र आहे. सर्वसामान्य घरातल्या अनेक मुलींनी घर चालवण्यासाठी आणि चरितार्थासाठी हा मार्ग निवडला आहे. 

वास्तविक, बंदी असली तरी छुप्या पद्धतीनं श्रीलंकेत वेश्या व्यवसाय सुरूच असायचा. पूर्वीपासून शरीरविक्रय करणाऱ्या महिला सध्या या व्यवसायात आहेतच, मात्र अनेक नव्या तरुणीही आता वेश्या व्यवसायाकडे वळू लागल्या आहेत. 

नोकरी गेल्याने करावा लागतो वेश्या व्यवसाय

परिस्थितीचा मार

21 वर्षांची इशा (बदललेलं नाव) आठवड्यातील काही दिवस स्पा सेंटरमध्ये जाऊन पैसे कमावते. तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आणि वडील सतत आजारी असतात. तिचा भाऊ श्रीलंकेच्या सैन्यदलात कार्यरत आहे आणि तो सतत बाहेरच असतो. त्याचं लग्न झालंय आणि त्याच्यावर बायको आणि मुलांची जबाबदारी आहे. त्यामुळे वडिलांचा सांभाळ करणं आणि चरितार्थ चालवणं याची जबाबदारी तिच्या एकटीवर आहे. पूर्वी इशा एका कंपनीत नोकरी करत असे. त्या कामातून तिला महिन्याला 25 हजार रुपये मिळत. भारतीय चलनात पूर्वी याची किंमत होती 12 हजार रुपये, आता किंमत आहे 6 हजार रुपये. श्रीलंकेचं दिवाळं निघाल्यावर ही कंपनीच बंद झाली आणि इशावर बेरोजगारीचं संकट कोसळलं. एका कंपनीत नोकरी करता करता ती उच्चशिक्षण घेत होती. उच्चशिक्षण पूर्ण केल्यावर अधिक चांगली आणि मोठ्या पदाची नोकरी मिळेल, असं तिचं स्वप्न. पण देशावर ओढवलेल्या आर्थिक संकटाने तिच्या स्वप्नाचा भंग झाला. मात्र तिने अजूनही आशा सोडलेली नाही.

ती सांगते, “माझा भाऊ सैनिक आहे. तो जेवढं कमावतो, ते त्याच्या स्वतःच्या कुटुंबालाही पुरेसं होत नाही. मी नोकरी करत होते. पण नोकरी गेल्यावर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. नवी नोकरीही मिळत नव्हती. त्यानंतर मी गुगल सर्च केला आणि कुठल्या कामातून पैसे मिळतील, याचा शोध घेतला. त्यावेळी स्पा सेंटर्समध्ये काही ओपनिंग्स होत्या. मी अर्ज केला आणि तिथं मला काम मिळालं. नाईलाजानं हे काम करावं लागतं. दररोज कामावर जाताना मनात एकच भिती असते की तिथं ओळखीचं कुणी तर येणार नाही ना?”

सर्वाधिक पैसे वेश्या व्यवसायातून

श्रीलंकेत शरीरविक्रय हाच सध्या सर्वाधिक पैसा मिळणारा व्यवसाय ठरतो आहे. गेल्या काही महिन्यांत जवळपास 40 हजार तरुणी या व्यवसायात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक संख्या ही राजधानी कोलंबोतच आहे. इथली स्पा सेंटर्स 24 तास सुरू असतात. लवकरात लवकर देशाची परिस्थिती सुधारावी आणि कंपन्या पूर्वीप्रमाणे सुरू व्हाव्यात, अशी इशासारख्या लाखो मुलींची अपेक्षा आहे. सध्या मात्र दिवस ढकलण्यापलिकडे त्या काहीच करू शकत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी