Murder of family : सासू, दीर, भावजय आणि पुतणी… महिलेनं केली सर्वांची हत्या, कारण होतं किरकोळ

किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर कुटुंबातील सुनेनं सासू, दीर, भावजय आणि पुतणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Murder of family
महिलेनं केली सासूसह चौघांची हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रक्षाबंधनाच्या पूजेवरून झाला वाद
  • महिलेनं केली चौघांची हत्या
  • सासू, दीर, भावजय आणि पुतणीचा खून

Murder of family : घरात राखीपौर्णिमेची पूजा (Raksha Bandhan Pooja) करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात महिलेनं घरातील चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील हावडा परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका महिलेनं आपला दीर, भावजय, सासू आणि पुतणी या सर्वांची हत्या केली. सासू माधवी, दीर देबाशिष, भावजय रेखा आणि 13 वर्षांच्या पुतणीवरही चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. 

पूजेवरून झाला वाद

घरात राखीपौर्णिमेची पूजा करण्यावरून वादाला तोंड फुटलं यावरून आरोपी पल्लवीचा तिच्या सासूसोबत वाद झाला. एकत्र कुटुंब म्हणून राहणाऱ्या या परिवारात सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं होतच होती. घटनेच्या दिवशी पूजा करण्याबाबतच्या एका वादातून भांडणाला सुुरुवात झाली. त्यानंतर बाथरूममधील नळ सुरूच राहिल्याचं पल्लवीच्या लक्षात आलं. सासूने हा नळ सुरू ठेवला असावा, असं वाटल्यामुळे त्यावरून तिने सासूला खडे बोल सुनावले. घरात नळ सुरु राहणं आणि पाणी वाया जाणं या गोष्टींमुळे संपत्ती निघून जाते, असं म्हणत तिने सासूसोबत वाद घालायला सुरुवात केली. 

वाद गेला विकोपाला

सासूसोबत पल्लवीचा वाद सुरु असताना वादात पल्लवीच्या भावजयीनेदेखील उडी घेतली आणि वाद आणखीनच वाढला. काही वेळातच या भांडणाचं रुपांतर शारीरिक मारामारीत व्हायला सुरुवात झाली आणि पल्लवीची सासू तिच्या दिशेने चालून आली. त्यावर राग डोक्यात भिनलेल्या पल्लवीने जवळचा चाकू उचलून सासूच्या मानेवर सपासप वार केले. यात जखमी होऊन सासू खाली पडल्यावर तिला वाचवण्यासाठी पल्लवीचा दीर आला. मात्र त्याच्याही खांद्यावर आणि छातीवर तिने वार केले. त्याच्या मानेवरही जीवघेणे वार करण्यात आले. त्यानंतर मध्ये पडलेल्या आपल्या भावजयीवर आणि तेरा वर्षांच्या पुतणीवरही तिने सपासप वार केले. या हल्ल्यात चौघेही  गंभीर जखमी झाले. मानेवर वार झाल्यामुळे चौघांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. 

अधिक वाचा - Monkeypox: मंकीपॉक्सचा धोका वाढला; व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव

भांडण की कट?

पल्लवी तिचा पती आणि मुलासोबत एकत्र कुटुंबात राहत होती. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात थेट चौघांचीही हत्या करण्यात आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. केवळ तात्कालिक कारणातून झालेल्या भांडणातून या हत्या झाल्या की अगोदरच रचलेल्या कटकारस्थानाचा हा भाग होता, याचा तपास पोलीस करत आहेत. 

अधिक वाचा - Montenegro: घरगुती वादातून राग अनावर, रस्त्यावर येऊन अंदाधुंद गोळीबार; 11 जणांचा मृत्यू

पल्लवी मनोरुग्ण?

आरोपी पल्लवी ही गेल्या काही महिन्यांपासून औषधोपचारांवर होती, अशी माहिती समोर आली आहे. तिची मानसिक अवस्था नीट आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. मानसिक विकृतीतून तर तिने हे कृत्य केले नाही ना, याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी