#No2Hijab | अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांसाठी कडक कायदे आहेत. पुरूष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळे कायदे असून महिलांना अधिक बंधनात राहावं लागतं. या कायद्यांना महिलांचा विरोध असतो. कधी तो व्यक्त होतो, तर कधी अव्यक्तच राहतो. मात्र बंधनात राहायला कुणालाच आवडत नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. इराणमधील महिलांमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या बंधनामुळे साचलेला राग अखेर बाहेर यायला सुरुवात झाली असून हजारो महिला रस्त्यावर येऊन हिजाबला विरोध करू लागल्या आहेत. आम्ही काय पेहराव करायचा, याचं स्वातंत्र्य आम्हाला असलं पाहिजे, अशी मागणी करत या महिलांनी आंदोलन सुरू केलं आहे.
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार मंगळवारपासूनच या आंदोलनांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी इराणमध्ये आंतरराष्ट्रीय हिजाब दिवस साजरा होत होता. त्याच दिवशी देशभरातील महिला रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. मंगळवारी झालेल्या मुख्य आंदोलनात महिलांनी रस्त्यावर येत हिजाब फेकून दिले. आपापल्या घरातून हे हिजाब आणून ते सार्वजनिक रस्त्यांवर फेकण्यात आले. या आंदोलनाचा व्हिडिओदेखील महिलांनी रेकॉर्ड केला. अमेरिकेतील हिजाब विरोधी कार्यकर्ते मसीह अलीनेजाद यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. ट्विटरवरून सर्वप्रथम त्यांनीच या आंदोलनाची हाक दिली होती. इराणनं हिजाबच्या सक्तीबाबत केलेला कायदा अमानवी असून तो लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी महिलांनी केली.
अधिक वाचा - पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलची हत्या, बलूच बंडोखोरांची कारवाई
इराण हा तेलाच्या बाबतीत समृद्ध असणारा देश अनेक उलथापालथी पाहत आलेला आहे. 1979 साली इराणमध्ये झालेली इस्लामी क्रांती हा हिजाब कायद्याच्या निर्मितीतील महत्त्वाचा टप्पा होता. या क्रांतीच्या अखेरीस असा कायदा करण्यावर एकमत झालं होतं. त्यानुसार इराणमध्ये 9 वर्षांपेक्षा मोठ्या महिलांना हिजाबने आपलं डोकं झाकणं बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालता या महिला वावरू शकत नाहीत. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सैन्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हिजाब न घालणाऱ्या महिलांचं काय करायचं, याचा फैसला सैन्यातले जवान आणि अधिकारी करताना दिसतात.
अधिक वाचा - ...अखेर ब्युटी क्विन सुष्मिता अडकली मोदीच्या बंधनात, IPL च्या माजी अध्यक्षांनी दिली गुड न्यूज
एकीकडे देशभरातील महिला सरकारच्या विरोधात आंदोलन करत होत्या, तर इराणच्या सरकारी वाहिनीवरून मात्र हिजाबचं महत्त्व समजावून सांगणारे व्हिडिओ प्रसारित केले जात होते. हिरव्या रंगाचा हिजाब घालून 13 महिला नृत्य करत असल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात येत होतं. हिरव्या रंगाचा हिजाब आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या या महिला हिजाब कसा फायद्याचा आहे, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. कुराणमधील काही दाखले देत हिजाबचं महत्त्व पटवून देण्याच्या या सरकारी प्रयत्नाची सर्वत्र खिल्ली उडवली जात होती. यावरून अनेक मीम्सही तयार झाले. सोशल मीडियावर सरकारी वाहिनीवरील या कार्यक्रमाची जोरदार चेष्टा केली जात होती.
सरकार मात्र कायद्यात कुठलाही बदल करण्याच्या तयारीत नाही. हा काही पुरोगामी संघटनांचा अशांतता आणि गैरसमज पसरवण्याचा डाव असल्याचा आरोप सरकारने केला आहे.