World Laughter Day : कोरोनाच्या संकटकाळात रोज करा ३० मिनिटांचा लाफ्टर योगा, राहा तणावमुक्त

लोकल ते ग्लोबल
Updated May 02, 2021 | 18:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी वर्ल्ड लाफ्टर डे साजरा केला जातो. मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आहे. या दिवशी स्वत:देखील हसा आणि इतरांनाही खूप हसवा.

World Laughter Day
जागतिक हास्य दिन 

थोडं पण कामाचं

  • हसण्याचे महत्त्व
  • हसा आणि तंदुरुस्त राहा
  • लाफ्टर योगा

नवी दिल्ली : आज वर्ल्ड लाफ्टर डे (World Laughter Day) आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी वर्ल्ड लाफ्टर डे साजरा केला जातो. मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आहे. यावर्षी कोरोना दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अतिशय चिंताग्रस्त आणि तणावाचे आयुष्य जगतो आहे. अशा परिस्थितीत लाफ्टर डे च्या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यास मदत होईल. या दिवशी स्वत:देखील हसा आणि इतरांनाही खूप हसवा.

कोरोनाचा तणाव

कोरोना महामारीमुळे सर्वांना घरातच अडकून राहावे लागते आहे. विविध निर्बंधाचे पालन करायचे आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करायचे आहे. अशा या कठीण काळात उदास आणि दु:खी होण्याऐवजी रोज ३० मिनिटांचा लाफ्टर योगा जरूर करा. यामुळे तुम्ही सकारात्मक राहाल, तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील आणि त्यामुळे तुम्ही तंदुरुस्तदेखील राहाल. हसण्यामुळे तुमची रोग प्रतिकारक्षमता वाढते.

लाफ्टर डे चा इतिहास


वर्ल्ड लाफ्टर डे ची सुरूवात भारतातच झाली आहे. या दिनाची सुरूवात योग आंदोलनाचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली होती. त्यांनी ११ जानेवारी १९८८ला मुंबईत पहिल्यांदा वर्ल्ड  लाफ्टर डे साजरा केला होता. लोकांच्या आयुष्यातील तणाव कमी करणे हा यामागचा उद्देश होता. थोड्या वेळासाठी का होईना पण लोकांनी आपल्या आयुष्यातील तणाव विसरून हसावे असा याचा उद्देश होता.

लाफ्टर डेचे महत्त्व


हसण्याचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. कोणत्याही कारणाने असो पण हसल्यावर प्रसन्न वाटते. शिवाय हसणे हा एक चांगला व्यायामदेखील आहे. यामुळे तुम्ही तणावापासून लांब राहता. हसण्यामुळे तुमचे आरोग्य ठणठणीत राहते.

हसण्याचे फायदे -

  1. हसण्याचे खूप फायदे आहेत. हसण्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा व्यायाम होतो. हसण्यामुळे तुम्ही उत्साही आणि निरोगी राहता. असे म्हणतात की  जो जास्त हसतो तो जास्त जगतो.
  2. कोरोना काळात आपण सर्व तणावात आहोत. अशावेळी हसणे खूप महत्त्वाचे आहे. हसण्यामुळे तणाव कमी होतो आणि डिप्रेशनदेखील कमी होते.
  3. हसण्यामुले शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हसताना आपण दीर्घ श्वास घेतो. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरणदेखील वाढते.
  4. लाफिंग थेरेपी आणि योग करण्याचा सल्ला डॉक्टरदेखील देतात. यामुळे शरीरात स्फूर्ती येते.
  5. हसणे हा उत्तम उपाय आहे. रोज १० मिनिटे मनसोक्त हसल्याने तुमच्या २० ते ३० कॅलरी खर्च होतात. शिवाय तुमचा तणावसुद्धा गायब होतो.

कोरोनाच्या संकटकाळात ताणतणाव, भीती आणि चिंता वाढली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शरीराबरोबरच मनाच्या आरोग्याचेही महत्त्व आहे. हसण्यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. सध्याच्या या अभूतपूर्व संकटात त्यामुळे आपले मनोबल टिकून राहण्यास मदत होईल. हास्य हे खूप मोठे औषध असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी