LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 29 October 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 29 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 29 October 2022 Latest Update

 Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Oct 29, 2022  |  07:31 PM (IST)
‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघ परिसरात 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 नंतर जाहीर प्रचार करण्यासह विविध निर्बंध

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंधदेखील लागू होत आहेत. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश अंधेरी पूर्व विधानसभा  मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.

येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

Oct 29, 2022  |  02:10 PM (IST)
एपीएमसीमध्ये भाज्याचें दर वाढले, परतीच्या पावसाचा ग्राहकांना फटका

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे मेथी, पालक शेपूच्या दरात १८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ४००० ते ८५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सद्यस्थितीत १०० जुड्यांप्रमाणे कोंथिबीर १२ हजार रुपये दराने विकली जात आहे. मिरचीच्या दरात ८०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पावटा व वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कोबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. एकंदरीतच सर्वच भाज्यांच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. अवकाळी पावसाचा फटका विशेषतः पालेभाज्यांना बसल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्या अशी माहिती व्यापारीवर्गाने दिली आहे. 

Oct 29, 2022  |  02:04 PM (IST)
ठाणे : कोपरी पुलाच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक बदल
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलावर तुळई बसविली जाणार आहे. या कामामुळे शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजतापर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कोपरी पूलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून शनिवारपासून सोमवारपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर तुळई बसविली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद ठेवली जाणार असून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजतापर्यंत आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. प्रवेश बंद – नाशिक मुंबई महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा महापे मार्गे रबाळे-ऐरोली पूल येथून मुंबईत इच्छित स्थळी जातील.
Oct 29, 2022  |  11:53 AM (IST)
बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू, बसचालकाला अटक

बसखाली चिरडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बसचालक महेश गाडीलकर यांना अटक करण्यात आली आहे. मालिनी सादये असे मृत महिलेचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार मालिनी सादये दररोज सकाळी कुर्ला डेपोजवळ फिरायला जात.  27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ती फिरायला निघाली आणि घरी परत आलीच नाही. म्हणून त्यांच्या मुलीने कुर्ला बेस्ट डेपोजवळ चौकशी केली असता तिला अपघात झाल्याचे समजले.  जिथे तिची आई 310 क्रमांकाच्या डबल डेकर बसच्या मागच्या टायरखाली येऊन जखमी झाल्याचे समजले. व तिच्या आईला सायन रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. कुर्ला डेपो परिसरातून बस सुटत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला टायरखाली झोपलेली दिसत आहे.  महिला टायरखाली कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत.  बसमधील कंडक्टरने सर्व बाजू तपासल्या आणि बस पुढे नेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला.  मात्र बस सुरू होताच महिलेचा मागच्या डाव्या टायरखाली चिरडला गेला.  प्रवाशांनी आरडाओरड करून बस थांबवली आणि महिलेला सायन रुग्णालयात हलवले असता तिला मृत घोषित करण्यात आले. कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ आणि 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


 

Oct 29, 2022  |  11:04 AM (IST)
भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात होणार मोठा बदल
Oct 29, 2022  |  08:29 AM (IST)
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची होणार चौकशी


 
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केले आहेत. SRA मध्ये पेडणेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांकडून किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.

Oct 29, 2022  |  07:12 AM (IST)
महाविकास आघाडीच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढली, राज्य सरकारचा निर्णय

महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. तर  जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे.

Oct 29, 2022  |  06:19 AM (IST)
किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पोलिसांनी केली चौकशी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत सापडल्या आहेत. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटं चौकशी झाली आहे. आज शनिवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. मात्र, याप्रकरणी काही लोकांची चौकशी केली असता दोन किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर आलं होतं. याचप्रकरणी शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

Oct 29, 2022  |  06:15 AM (IST)
अंधेरी पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवाराची थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे.
 

Oct 29, 2022  |  06:13 AM (IST)
वर्धा : रिधोरा धरणात 2 जणांचा बुडून मृत्यू 

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा रिधोरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात घडली.  सौरभ बावरकर आणि विकास नवघरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. चार मित्र शुक्रवारी रिधोरा धरण परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान ते धरणामागील घोगरा परिसरात गेले. यावेळी त्यांचा एक मित्र धरणात पोहायला उतरला होता. तो पाण्यात बुडू लागला म्हणून दोन मित्र त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र वाचवायला गेलेले दोघे मित्रही बुडू लागले. यावेळी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी एकाला सुखरुप वाचवले. तर वाचवायला गेलेले दोघे जण बुडाले.


 

Oct 29, 2022  |  07:17 AM (IST)
इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीवरुन बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बंगळुरुला जाणाऱ्या 6E-2131 या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं लक्षात येताच दिल्लीमध्ये लँडिंग करण्यात आलं.सविस्तर बातमी:  IndiGo Flight: टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग