भयाण! गंगा किनारी साचला ४०- ४५ मृतदेहांचा ढीग, कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील स्थानिकांच्या आठवड्याची सुरुवात खूपच भयानक स्थितीत झाली. सोमवार हा दिवस आपण सर्वात चांगला मानत असतो, पण याच दिवशी येथील नागरिकांना एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले.

40-45 bodies piled up on Ganga's banks
गंगा किनारी साचला ४०- ४५ मृतदेहांचा ढीग  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • उत्तर प्रदेशातून गंगा नदीत वाहत आले मृतदेह
  • मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आहे.
  • पाच ते सात दिवसांपासून पाण्यात होते मृतदेह

पाटणा :  बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील स्थानिकांच्या आठवड्याची सुरुवात खूपच भयानक स्थितीत झाली. सोमवार हा दिवस आपण सर्वात चांगला मानत असतो, पण याच दिवशी येथील नागरिकांना एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. गंगेच्या किनाऱ्यावरून पाण्यात तरंगणारे मृतदेह दिसत असल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातारण तयार झाले आहे. गंगा किनारी साधरण ४०-४५ मृतदेह वाहात आलेले पाहिल्याचे स्थानिक सांगतात. स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की, हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहात आले आहेत. ते कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आल्याने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याने त्यांना तसंच नदीत सोडून देण्यात आले असावे असे काही अधिकारी नाव जाहीर न करता सांगत आहेत. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. “४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

“हे मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याने फुगले आहेत. आम्ही त्यांची विल्हेवाट लावत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत,” अशी माहिती के के उपाध्याय या अधिकाऱ्याने दिली आहे. “हे मृतदेह येथील नाहीत, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही,” असंही ते म्हणाले आहेत.भारतात विशेषतः उत्तर भारतात कोरोना बळींची संख्या प्रत्यक्षाहून अधिक असण्याची शंका नेहमीच वर्तवण्यात येते. या पद्धतीच्या दृश्याने आणि बातम्यांमुळे त्याला बळ मिळत आहे.

दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. करोनाची लागण होण्याची भीती असून गावकऱ्यांनी हे मृतदेह दफन करण्याची मागणी केली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी