अल-कायदाच्या ९ जणांना अटक, देशात मोठा घातपात घडविण्यापूर्वीच NIA ने केली कारवाई 

NIA Raids: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) अल-कायदा मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे एजन्सीने छापा टाकला आहे.

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये एनआयएने एकाच वेळी टाकले छापे
  • अन्वेषण यंत्रणेने अल कायदाच्या ९ कार्यकर्त्यांना केली अटक 
  • पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे तपास यंत्रणांनी टाकले छापे 

नवी दिल्ली: राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)ने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या छाप्यांमध्ये अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर, एनआयएने एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांच्या अटकेबाबत एनआयएने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'तपासणी दरम्यान असे उघडकीस आले आहे की मॉड्यूल सक्रियपणे निधी गोळा करीत होता आणि काही दहशतवादी हे शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी नवी दिल्लीत येणार होते. दरम्यान, देशाच्या विविध भागात संभाव्य दहशतवादी हल्ल्यापूर्वी या सर्वांना अटक करण्याता आली आहे.'

राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने पश्चिम बंगालमधील लियू यिन अहमद आणि अबू सुफियान आणि केरळमधील मोस्राफ हुसैन आणि मुर्शीद हसन यांच्यासह अल कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीत या अटक करण्यात आलेल्या या व्यक्तींना पाकिस्तानस्थित अल-कायदाच्या अतिरेक्यांनी सोशल मीडियावर कट्टरपंथी बनवलं. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजधानीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यास उद्युक्त केलं जात होतं. मात्र त्याआधीच या सर्वांना अटक करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी