Air India Plane Crash Updates : एअर इंडिया विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Air India Express plane Crash: एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. एअरपोर्टवर लँडिंग करताना विमानाला अपघात झाला आहे. अपघातावेळी विमानात १९१ प्रवासी प्रवास करत होते.

Air India Express plane skidded
एअर इंडिया विमानाला अपघात   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावरील घटना 
  • विमान लँडिंगवेळी झाला अपघात 
  • घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू

केरळ : एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला (Air India Express plane) केरळमध्ये अपघात झाला आहे. कोझीकोडच्या करिपूर एअरपोर्टवर (Karipur Airport Kozhikode) लँडिंग करताना विमानाला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी विमानात १९१ प्रवासी प्रवास करत होते. केरळमधील कोझीकोड येथे विमानाचं लँडिंग होत असताना विमान रनवे वरुन घसरलं आणि त्यानंतर अपघात झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसेच मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. रात्री ७ वाजून ४० मिनिटांच्या आसपास हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातातील मृतांचा आकडा आता वाढला आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याचं समजते आहे. दरम्यान, या अपघातात १२० जण जखमी झाले असून जखमींपैकी १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी १५ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केरळमधील कोझीकोड विमानतळावरील एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरुन घसरलं आणि हा अपघात झाला. विमान घसरून अपघात झाल्यानंतर विमानाचे अक्षरशः दोन भागात विभाजन झाल्याचं दिसत आहे. हे विमान दुबईहून १९१ प्रवाशांसह भारतात येत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक आमदाराच्या मते अपघातानंतर विमान हे दरीत कोसळले. 

विमान अपघातात पायलट दीपक साठे यांचा मृत्यू 

कोझीकोड येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन विमानाचे दोन तुकडे झाले. ज्यावेळी विमान रनवेवर लँड करत होते त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. या अपघातात विमानाचे पायलट दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला आहे.

(पायलट दीपक वसंत साठे यांचा फोटो)

केरळमध्ये झालेल्या या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारकडून सर्व मदत केली जाईल असंही सांगितलं.

डीजीसीए ने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस IX1344, B737 दुबईहून केरळमध्ये येत होतं. या विमानात १९१ प्रवासी होते. मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवर लँड होताच घसरलं आणि विमानाचा अपघात झाला. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता डीजीसीएने दिले आहेत.

विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केलं आहे. अमित शहा यांनी ट्वीट करत म्हटलं, केरळच्या कोझीकोड येथे एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला अपघात झाला असून मी एनडीआरएफला लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि बचाव कार्यात मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विमान अपघातानंतर आग लागलेली नाहीये. या विमानात १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केब्रिन क्रू प्रवास करत होते अशी माहिती नागरी उड्डयन मंत्रालयाचे अतिरिक्त डीजी (मीडिया) राजीव जैन यांनी दिली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

हेल्पलाईन नंबर जाहीर 

घटनास्थळी आताही पाऊस सुरू आहे आणि अंधार पडल्यामुळे बचाव-मदत कार्यात अडथळा येत आहे. या विमान अपघातानंतर प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575 हे हेल्पलाईन नंबर असून यावर कॉल करुन प्रवाशांचे नातेवाईत अधिक माहिती मिळवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी