Air India Plane Crash: प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं कसा घडला अपघात, पाहा VIDEO

Calicut Air Crash: केरळमधील कोझीकोड येथील विमानतळावर शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. हा अपघात नेमका कसा झाला हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं

Air india plane crash
एअर इंडिया विमानाला अपघात   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • एअर इंडिया विमान अपघातात मराठमोळे कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू 
  • कॅप्टन दीपक साठे यांच्यासोबत को पायलट अखिलेश कुमार यांचाही मृत्यू 

Air India Plane Crash: केरळमधील कोझीकोड (Kozhikode) येथे असलेल्या करिपूर विमानतळावर शुक्रवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात (Air India Plane Crash) झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. एअर इंडिया एक्सप्रेस IX1344, B737 दुबईहून केरळमध्ये येत होतं. विमान करिपूर विमानतळावर लँड होत असताना रनवेवरुन घसरलं आणि अपघात झाला. या अपघातात मुख्य पायलट दीपक साठे आणि को पायलट अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. या विमान अपघाताचे फोटोजही समोर आले असून त्यावरुन हा अपघात किती भीषण होता याची कल्पना केली जाऊ शकते.

सीआयएसएफ (CISF)चे एएसआय अजित सिंह हे एअर इंडिया विमान अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्यांनी या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. एएसआय अझित सिंह म्हणाले, एअर इंडिया एक्सप्रेस विमान पॅरामीटर रोडच्या दिशेने पडताना मी पाहिले. मी ७.३ वाजता तिसऱ्या राऊंडसाठी बाहेर पडलो. एमर्जन्सी गेटवर मी पोहोचलो आणि तेव्हा मी पाहिलं की एअर इंडिया विमानाचं नियंत्रण बिघडलं आणि ते पॅरामीटर रोडच्या दिशेने खाली कोसळत आहे. तेव्हा मी तात्काळ कंट्रोल रूमला कळवलं आणि तोपर्यंत विमान खाली कोसळलं होतं.

विमान अपघात झाल्यावर जे तात्काळ घटनास्थळी पोहोचले अशांपैकी एका प्रत्यक्षदर्शीची मुलाखत टाइम्स नाऊच्या दीपक बोपन्ना यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्या व्यक्तीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. त्या व्यक्तीने म्हटलं, मी एक प्रचंड जोरदार आवाज ऐकला. मी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर राहतो. मी घटनास्थळी ५ मिनिटांत पोहोचलो तेव्हा तेथे एक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल दाखल झाले होते. प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. अपघातापूर्वी अर्धा तास विमान आकाशात गिरट्या घातल असल्याचं माझ्या लक्षात आले होते. विमानातून मी एका लहान मुलाला आणि इतर पाच जणांना बाहेर काढले.

आर्थिक मदतीची घोषणा

कोझीकोड येथे झालेल्या विमान अपघातानंतर नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची तर गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी