Air India Plane Crash: ...तर विमान अपघात टळला असता

Calicut Air Crash: कोझीकोड येथील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघाता प्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली आहे. पाहूयात सविस्तर वृत्त...

Air India Express plane skidded
एअर इंडिया विमानाला अपघात   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला शुक्रवारी कोझीकोड येथील विमानतळावर भीषण अपघात 
  • अपघातानंतर विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले, १८ जणांचा मृत्यू 
  • विमान अपघातातील मृतकांमध्ये कॅप्टन दीपक साठे, को-पायलट अखिलेश कुमार यांचाही मृत्यू 

कोझीकोड : केंद्र सरकारच्या 'वंदेभारत' अभियानांतर्गत (Vande Bharat Mission) परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्यात येत आहे. अशाच प्रकारे शुक्रवारी एअर इंडिया एक्सप्रेस विमान दुबईहून केरळमधील कोझीकोड (Kozhikode) येथे येत होते. कोझीकोड येथील विमानतळावर लँडिंग दरम्यान विमान रनवेवरुन खाली घसरले आणि ३३० फूट खोल दरीत कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानात पायलट आणि केबिन क्रू यांच्यासह एकूण १९० जण होते. या अपघातात कॅप्टन दीपक साठे (Captain Deepak Sathe), को-पायलट अखिलेश कुमार यांचाही मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचे फोटोज समोर आले असून ते पाहिल्यावर अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. आता या अपघात प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष? 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ मिनिटांनी खराब हवामान आणि वादळाचा इशारा दिला होता. मात्र, विमानतळ प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि गांभीर्याने न घेतल्याचं दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रथम धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर हे विमान अन्य ठिकाणी वळविण्यात यायला हवं होतं.

२०१५ मध्ये डीजीसीएने कॅलिकट विमानतळावरून वाइडबॉडी विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगवर बंदी घातली होती. मात्र, २०१९ रोजी आपला आदेश मागे घेत पुन्हा परनवागी देण्यात आली. जर हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं असतं तर कदाचित हा अपघात टाळता आला असता आणि १८ जणांचे प्राणही गेले नसते. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं कसा घडला अपघात

केरळमधील कोझीकोड येथे झालेला विमान अपघात नेमका कसा झाला याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. सीआयएसएफ (CISF)चे एएसआय अजित सिंह हे एअर इंडिया विमान अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्यांनी या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तर विमान अपघात झाल्यावर जे तात्काळ घटनास्थळी पोहोचले अशांपैकी एका प्रत्यक्षदर्शीची मुलाखत टाइम्स नाऊच्या दीपक बोपन्ना यांनी घेतली आहे. त्या व्यक्तीने म्हटलं, मी एक प्रचंड जोरदार आवाज ऐकला. प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. अपघातापूर्वी अर्धा तास विमान आकाशात गिरट्या घातल असल्याचं माझ्या लक्षात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी