नवी दिल्ली : टीआरपी घोटाळा (TRP scam) प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले रिपब्लिक टीव्हीचे एडिटर एन चीफ अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून एक खळबळजनक खुलासा झाला आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत कारवाई केली होती. मात्र, भारताकडून हा एअर स्ट्राईक करण्यात येणार असल्याची कथितपणे पूर्वकल्पना अर्णब गोस्वामी यांना होती. इतकेच नाही तर अर्णब यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात इतकी मोठी गोपनीय आणि संवेदनशील माहिती बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना सांगितली.
अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियात लीक झाले असून त्यानुसार, पत्रकाराने दावा करत संकेत दिले आहेत की, 'भारत काहीतरी मोठे करणार आहे आणि ही कारवाई सामान्य हल्ल्यापेक्षा मोठी असेल.' २३ फेब्रुवारी २०१९ रोजी पार्थो यांच्यासोबत अर्णब यांनी हे संभाषण केले आहे. या चॅटच्या तीन दिवसांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला.
बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात गोपनीय आणि संवेदनशील माहिती कथितपणे अर्णब यांच्याकडे होती अशी माहिती समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, संसदीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे.