राजस्थान काँग्रेसच्या मंत्र्याची आक्षेपार्ह भाषा

Ashok Chandana Viral Audio एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात राजस्थान सरकारमध्ये मंत्री असलेला काँग्रेसचा नेता आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन बोलताना ऐकू येत आहे.

Ashok Chandana Viral Audio
राजस्थान काँग्रेसच्या मंत्र्याची आक्षेपार्ह भाषा 

थोडं पण कामाचं

  • राजस्थान काँग्रेसच्या मंत्र्याची आक्षेपार्ह भाषा
  • ऑडिओ झाला व्हायरल
  • मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: राजस्थानमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. प्रचार जोर पकडत असतानाच एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात राजस्थान सरकारमध्ये मंत्री असलेला काँग्रेसचा नेता आक्षेपार्ह भाषेचा वापर करुन बोलताना ऐकू येत आहे. (Ashok Chandana Viral Audio)

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात अशोक चांदना आहेत. ते राज्याचे क्रीडा खात्याचे स्वतंत्र प्रभार सांभाळणारे राज्यमंत्री आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत. सार्वजनिक जीवनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्या अशोक चांदना यांनी केलेल्या वक्तव्याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. ऑडिओमध्ये अशोक चांदना यांचे जे वक्तव्य ऐकू येत आहे त्याने राजस्थानमध्ये अनेकांना धक्का बसला आहे. एका मंत्र्याने अशी भाषा वापरणे योग्य नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकांनी चांदना यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे मत व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने आंदोलन केले होते. हे आंदोलन थांबावे यासाठी सरकारच्यावतीने बोलणाऱ्या प्रतिनिधींमध्ये अशोक चांदना होते. एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चांदना यांचा ताजा व्हायरल होत असलेला ऑडिओ धक्कादायक असल्याचे मत राजस्थानमध्ये व्यक्त होत आहे. ऑडिओत अशोक चांदना यांचा आवाज ऐकू येत आहे. ते नैनवां पंचायत समितीच्या पाचव्या वॉर्डसाठी निवडणूक लढवत असलेल्या राजूलाल गुर्जर यांच्याशी बोलत आहेत. गुर्जर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांदना यांना पचनी पडलेला नाही. अशोक चांदना निवडणूक लढवत असलेल्या गुर्जर यांच्यावर नाराज असावेत असे त्यांच्या ऐकू येणाऱ्या आवाजावरुन वाटत आहे. 

पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या गुर्जर यांच्याशी अशोक चांदना बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. चांदना गुर्जर यांना उद्देशून बोलताना 'आता तू निवडणूक लढ, नाही लढलास तर मीच तुझी अशी तशी करू टाकेन, तू निवडणूक लढ. माझ्यासमोर वायफळ बोलतोस. तुझ्या लायकीपेक्षा जास्त काही करत आहेस, तुझ्यासाठी एवढ्या पंचायत समित्या मी लढवल्या....' असे वक्तव्य करत असल्याचे ऐकू येते. या ऑडिओमध्ये 'लायकीपेक्षा जास्त' ही शब्दरचना राजस्थानमध्ये अनेकांना खटकली आहे. गुर्जर समाजाच्या व्यक्तीला उद्देशून चांदना असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न राजस्थानमध्ये अनेकजण जाहीरपणे विचारू लागले आहेत. सोशल मीडियावर या ऑडिओचा संदर्भ देत अनेकांनी अशोक चांदना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

भाजपने व्हायरल ऑडिओ प्रकरणात चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास अशोक चांदना यांनी स्वतः नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या व्यक्तीकडून ज्या भाषेची अपेक्षा केली जाते तशी भाषा व्हायरल ऑडिओत ऐकू येत नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी