नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन लसी (Covaxin Vaccine)ला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपत्कालीन उपयोगासाठी मंजुरी दिली. यानंतर काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले. यावर आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होत आहे त्यापूर्वी भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बायोटेकचे सीएमडी डॉ कृष्णा एम एला यांनी कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. डॉ कृष्णा एम एला यानी म्हटलं, भारत बायोटेकने निर्मित केलेली कोव्हॅक्सिन ही लस जगातील सर्वात सुरक्षित आहे.
टाइम्स नाऊचे एडिटर इन चिफ राहुल शिवशंकर यांच्यासोबत विशेष चर्चेत भारत बायोटेकचे सीएमडी डॉ. कृष्णा एला यांनी म्हटलं, आम्ही राजकीय नेते नाहीत आणि राजकीय विचारसरणी ठेवत नाही. कोव्हॅक्सिन ही लस बहुतेक जगातील सर्वात सुरक्षित लस आहे. माझ्याकडे असलेली एकमेव विचारधारा म्हणजे विज्ञान आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, लसीवर टीका करणारे केवळ माझ्यावर दगडफेक करत नाहीयेत तर या देशातील स्टार्ट-अप आणि इनोव्हेटरवरही दगडफेक करत आहेत. आरोग्यसेवा हे संवेदनशील क्षेत्र आहे.
भारत बायोटेकच्या सीएमडींनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय संस्था (तृतीय पक्ष) दररोज चाचणीच्या संपूर्ण संचाचे परीक्षण करत आहे. भारत बायोटेक आपल्या २५ वर्षांच्या इतिहासात ही पहिल्यांदाच चाचणी करत नाहीये. आम्ही ७० क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. भोपाळमधील कोव्हॅक्सिन स्वयंसेवक मृत्यू प्रकरणावर सह-संस्थापक आणि जेएमडी भारत बायोटेक सुचित्रा एला यांनी म्हटलं, त्या व्यक्तीचा मृत्यू लसीच्या चाचणीशी संबंधित नव्हता.
डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतात आपत्कालीन उपयोगासाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित ऑक्सफर्डच्या 'कोविशिल्ड' लस आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचा समावेश आहे. मात्र, कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी मिळाल्यावर काँग्रेस नेत्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, "कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप घेतलेली नाहीये. त्यापूर्वीच लसीच्या उपयोगासाठी मान्यता देणे धोकादायक ठरू शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे."