भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री, सोमवारी शपथविधी

भूपेंद्र पटेल (५९) गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सत्ताधारी भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

Bhupendra Patel to be next CM of Gujarat
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री 

थोडं पण कामाचं

  • भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री
  • सोमवारी होणार शपथविधी
  • भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार

गांधीनगर: भूपेंद्र पटेल (५९) गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सत्ताधारी भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या आमदारांची आज (रविवार १२ सप्टेंबर २०२१) बैठक झाली. पक्षाच्या दिल्लीतून आलेल्या नेत्यांसोबत आमदारांनी चर्चा केली. यानंतर भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री या पदासाठी निश्चित झाले. सोमवारी त्यांचा शपथविधी होणार आहे. Bhupendra Patel to be next CM of Gujarat

भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीत १ लाख १७ हजार मतांनी विजय मिळवला होता आणि काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा पराभव केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना निवडणुकीच्या आधी जेमतेम एक वर्षाचा कार्यकाळ मिळेल. गुजरातमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये विधानसभेची निवडणूक होईल. या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून देण्यासाठी काम करण्याची जबाबदारी भूपेंद्र पटेल यांच्यावर सोपविली जाईल. 

याआधी विजय रुपाणी यांनी ७ ऑगस्ट २०१६ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. नंतर २०१७च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात पक्षाने पुन्हा विजय मिळवला. भाजपला विधानसभेच्या १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या. या विजयानंतर दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा रुपाणी यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. पण भविष्यातल्या आव्हानांचा विचार करुन भाजपने २०२२च्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला.

भाजपचे शिष्टमंडळ संध्याकाळी सहा वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटले. या भेटीनंतर शपथविधी सोमवारी होणार अशी माहिती भाजपने दिली. सोमवारी फक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल शपथ घेतील. इतर मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होईल, असे संकेत भाजपने दिले.

याआधी आमदारांच्या बैठकीत गुजरातचे हंगामी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया, पर्यवक्षेक म्हणून केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी, प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह गुजरातमधील भाजपचे आमदार उपस्थित होते. बैठक भाजपच्या गुजरात प्रदेश कार्यालयात पार पडली. 

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

  1. भूपेंद्र पटेल गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे समर्थक
  2. घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार
  3. आमदार होण्याआधी भूपेंद्र पटेल अहमदाबाद पालिकेचे नगरसेवक, अहमदाबाद शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच पटेल पाटीदार संघटनेच्या सरदार धाम आणि उमिया फाउंडेशनचे ट्रस्टी होते.
  4. भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे
  5. पटेल समाजाचे प्रतिनिधी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी