पाटणा: बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बिहारमधील विविध भाग जलमय झाले आहेत. नागरिकांच्या घरात पाणी, रुग्णालयात, दुकानांत पुराचं पाणी शिरलं आहे. पुरस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम एनडीआरएफच्या टीम करत आहेत.
सर्वसामान्य नागरिकच नाही तर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे पुराच्या पाण्यात अडकले होते. उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना एनडीआरएफच्या टीमने त्यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानावरुन रेस्क्यू करत सुरक्षितस्थळी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे आपल्या घरातच अडकले होते. याची माहिती एनडीआरएफला मिळताच एक टीम त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि सुशील मोदी यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.
या दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी पूरग्रस्त जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या अधिकाऱ्यांसोबत नितीश कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असून आढावाही घेणार आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध अपघातांत बिहारमध्ये आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमधील पूरस्थिती पाहता केंद्रीय मंत्री आणि पाटणा साहिबचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, मी आमदार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. मला सांगण्यात आलं आहे की, फरक्का बैराज डॅमचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि कोल इंडियाचे मोठे पंप पूराचे पाणी बाहेर काढण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पूरस्थिती नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच दोन हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.