नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय हवाई दलासाठी नवीन तेजस विमान खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार भारतीय वायुदलासाठी ७३ हलके लढाऊ विमान तेजस एमके - १ ए (Tejas Mk-1A)आणि १० तेसज एमके-१ ट्रेनर (Mk-1 Trainer) विमानांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४८,००० कोटी रुपये खर्च देणार आहे.
तेजस या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठीची एकूण ४८ हजार कोटी रुपयांची ही डील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (CCS) ने मंजुर केली आहे. या कराराबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं, वायुदलाची ताकद वाढवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा करार संरक्षण क्षेत्रात फार महत्वाचा ठरणार आहे.
लाईट कॉम्बॅट एमके-१ ए (Tejas Mk-1A fighter aircraft) हे एक लढाऊ विमान आहे जे स्वदेशी डिझाइन आणि विकसित करण्यात आले आहे. हे बंगळुरूच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवले आहे.
हलक्या तेजस लढाऊ विमानात स्कॅन रडार, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट आणि एअर टू एअर रिफ्युअलिंग सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. सध्या हे लढाऊ विमान ५० टक्के स्वदेशी होते आथा ते वाढून ६० टक्के इतके होणार आहे. या डीलमुळे आत्मनिर्भर अभियानाला गती मिळणार आहे.
तेजस डील संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने यापूर्वीच आपल्या नाशिक आणि बंगळुरू येथील विभागात दुय्यम उत्पादन निर्मितीची सुविधा सुरू केली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्याच्या एलसीए प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.