adhir ranjan chowdhury : नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करताना काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपत्नी असा शब्द उच्चारला. यानंतर राजकारण तापले.
घटनात्मक पदाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. अधीर रंजन चौधरी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांमध्ये शाब्दिक संघर्ष आणि एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे सभागृहात वातावरण तापले. अखेर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज थोडा वेळ तहकूब (स्थगित) केले.
सभागृह तहकूब झाल्यावर सदनाबाहेर येऊन अधीर रंजन चौधरी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना भाषेचा मुद्दा पुढे करून स्वतःचा बचाव सुरू केला. बंगाली असल्यामुळे हिंदी बोलताना चूक झाली असे संसदेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. काही पत्रकारांशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना भेटून त्यांची माफी मागेन अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. भाजपच्या अनेक खासदारांनी अधीर रंजन चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे ते पुन्हा माफी मागणार नाही अशी भूमिका खासदार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली. यानंतर सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा संसदेच्या आवारात झाल्या. यानंतर अशा घोषणा का देता म्हणून जाब विचारण्यासाठी सोनिया गांधी आक्रमक झाल्या. सोनिया यांचा पवित्रा पाहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लगेच आक्रमक झाल्या. मी मागणी करत आहे आपल्याला यावर काय म्हणायचे आहे अशा स्वरुपाचा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला. स्मृती इराणी यांच्या वक्तव्यानंतर मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची जाणीव होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या. त्यांनी सोनिया गांधी यांना मुद्दा भरकटत असल्याची जाणीव करून दिली. यानंतर सोनिया गांधी जास्त न बोलता लगेच निघून गेल्या.
सोनिया गांधी गेल्या तरी भाजप अधीर रंजन चौधरी यांच्या माफीच्या मागणीवर ठाम आहे. अधीर रंजन चौधरी यांनी घटनात्मक पदाचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून कायम आहे. यामुळे अधीर रंजन चौधरी यांचा मुद्दा आता कोणत्या दिशेला जातो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
मागील काही दिवसांपासून संसदेत जास्त कामकाज झालेले नाही. वारंवार विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात संघर्ष होत आहे. राज्यसभेतील २० आणि लोकसभेतील ४ विरोधी खासदारांचे आठवड्याभरासाठी निलंबन झाले आहे. या अशा वातावरणात आता अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ वाढण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.